राम मंदिर उभारणीबाबत मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारींनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीसाठीच्या कायद्याचे त्यांनी समर्थन केले आहे. मंदिराच्या निर्मितीसाठी सरकारने जर कायदा आणला तर त्याला आपला आक्षेप नसेल, असे त्यांनी म्हटले आहे. राम मंदिराचे पुजारी सत्येंद्र दास यांनी अन्सारी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. दरम्यान, अन्सारी यांचे हे वक्तव्य आश्चर्यचकित करणारे आहे. कारण अन्सारी यांनी यापूर्वी राम मंदिराचा तोडगा सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातूनच झाला पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली होती.

अन्सारी म्हणाले की, राम मंदिर निर्मितीसाठी सरकारने लोकसभेत विधेयक आणून त्या विधेयकाच्या माध्यमातून हे प्रकरण संपुष्टात आणले पाहिजे. सरकारने जरा कायदा केला तर आमचा आक्षेप नाही. आम्ही एकट्याने कायदा रोखू शकत नाही. भाजपा सरकार चांगले काम करत आहे. आम्ही त्यांचे कौतुक करतो.

अयोध्येत राजकीय नेते धरणे आंदोलन करण्यासाठी येतात. त्यांनी आपला हेतू सांगावा. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. अयोध्येत गर्दी उसळते. अशावेळी काही घटना घडली तर लोक काय करतील, असा सवाल त्यांनी केला.

अन्सारी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राम मंदिरचे पुजारी सत्येंद्र दास म्हणाले की, अन्सारींच्या वक्तव्याचे आम्ही स्वागत करतो. सरकारने यावर त्वरीत कायदा करुन मंदिराची उभारणी करावी. त्यांचे वडील हाशिम अन्सारी यांनीही अयोध्या वादासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी झाला नव्हता. मला वाटते त्यांच्या या वक्तव्यामुळे सरकारवरही याचा परिणाम होईल.