रेवाडी बलात्कार प्रकरणात एक महिला पोलीस उप-अधिक्षक हिरामणी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपींना पकडण्यामध्ये वेळ वाया घालवण्यात आला, त्यामुळे आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या घटनेतील एक आरोपी नीशूला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, अन्य दोन आरोपी मनीश आणि पंकज अजूनही फरार आहेत. यातील एक आरोपी हा भारतीय सैन्यातील जवान आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली असून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे, त्यासाठी अनेक ठिकाणी छापेमारीही करण्यात आली, मात्र अद्यापही आरोपींना पकडण्यात यश आलेलं नाही.

पीडित तरुणी ही सीबीएसई टॉपर असून कोचिंग क्लासला जात असताना नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. तरुणी सीबीएसईमध्ये २०१५ रोजी हरयाणा विभागात पहिली आली होती. २६ जानेवारी २०१६ रोजी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला होता. सध्या ती पुढील शिक्षण घेत होती.

या प्रकरणात दीनदयाल आणि डॉ. संजीव यांचाही समावेश आहे. दीनदयाल हा ट्यूबवेलचा मालक आहे. तिथेच ही घटना घडली होती. तर संजीव एक डॉक्टर आहे. तोही या घटनेत सहभागी असल्याचे पुरावे मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडेही चौकशी सुरू आहे. मुख्य आरोपी नीशूने हा कट रचला होता. त्यानंतर घटनास्थळी डॉक्टरला बोलावण्यात आले होते. या कटात सहभागी असलेला लष्कराचा जवान आणि अन्य एक आरोपी फरार आहे. त्याला लवकरच पकडण्यात येईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक भसीन यांनी व्यक्त केला आहे. पीडित मुलीला तीन लोक उचलून घेऊन येणार असल्याचे डॉ. संजीवला माहीत होते. संजीव घटनेच्या अखेरपर्यंत आरोपींबरोबर होता. परंतु, त्याने याबाबत कोणालाच काही सांगितले नाही. तर दीनदयालला त्याच्या वास्तूत काय होणार होते, याची माहिती होती. मोबाइल फॉरेन्सिक्समध्ये नीशू हा त्याच्या संपर्कात होता, हे सिद्ध झाले होते.

पोलिसांनी यापूर्वी आरोपींच्या अटकेसाठी तीन आरोपींचे छायाचित्र जारी केले होते. आरोपींमध्ये मनीश, नीशू आणि लष्कराचा जवान पंकजचा यात समावेश आहे.