News Flash

पंतप्रधानांना पाचारण करण्यावरून ‘जेपीसी’मध्ये शाब्दिक युद्ध

२-जी घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीपुढे (जेपीसी) पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पाचारण करावे, ही भाजपने केलेली मागणी म्हणजे ‘राजकीय स्टण्ट’ असल्याची टीका जेपीसीचे

| April 3, 2013 03:38 am

२-जी घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीपुढे (जेपीसी) पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पाचारण करावे, ही भाजपने केलेली मागणी म्हणजे ‘राजकीय स्टण्ट’ असल्याची टीका जेपीसीचे अध्यक्ष पी. सी. चाको यांनी केल्याने या समितीमध्ये नव्याने शाब्दिक युद्धाची ठिणगी पडली आहे.
माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी पंतप्रधानांवर गंभीर आरोप केल्याने त्यांनी समितीपुढे यावे, असे पत्र भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधानांना लिहिले, त्याबाबत चाको यांनी प्रश्न उपस्थित केला. समितीमधील एक सदस्य पंतप्रधानांना पत्र कसे लिहू शकतो, समितीने त्याबाबतचा निर्णय घ्यावयाचा आहे. त्यामुळे हा केवळ ‘राजकीय स्टण्ट’ आणि संसदीय निकषांच्या विरोधातील पद्धत आहे, असे चाको यांनी वार्ताहरांना सांगितले.
सिन्हा यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्राला कोणताही आधार नाही. कारण मंत्र्याला पाचारण करण्याचा निर्णय एका व्यक्तीने घ्यावयाचा नसतो तर समितीने घ्यावयाचा असतो, असेही चाको म्हणाले.
दरम्यान, २-जी घोटाळ्याची चौकशी करीत असलेल्या संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) कारभारच संशयास्पद असल्याची टीका करून भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी, २-जी घोटाळ्यातील सत्य बाहेर येण्यासाठी समितीपुढे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना पाचारण करण्याची मागणी केली.
यशवंत सिन्हा हे स्वत: जेपीसीचे सदस्य असून गेल्या दोन महिन्यांपासून समितीची बैठकच न बोलाविल्याबद्दल त्यांनी तीव्र हरकत घेतली आहे. माजी दूरसंचारमंत्री ए. राजा हे या घोटाळ्यातील मुख्य साक्षीदार असून त्यांनी समितीपुढे येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांना तशी मुभा द्यावी, अशी मागणीही सिन्हा यांनी केली आहे.
माजी दूरसंचारमंत्र्यांनी पंतप्रधानांवर आरोप केले असल्याने स्वत: डॉ. मनमोहन सिंग यांनी समितीपुढे हजर राहावे, असे पत्र सिन्हा यांनी पंतप्रधानांना लिहिले. पंतप्रधानांनी समितीपुढे येण्यास आढेवेढे घेतले तर त्यांना काही तरी दडवून ठेवावयाचे आहे हे सिद्ध होईल, असेही सिन्हा यांनी म्हटले आहे.
जेपीसीचा कारभार अध्यक्षांकडून ज्या पद्धतीने केला जात आहे त्यावरून सर्व प्रकार संशयास्पद वाटत आहे. गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून आपण आणि समितीचे अन्य सदस्य बैठक आयोजित करण्याची मागणी करीत असतानाही अध्यक्षांनी बैठकच आयोजित केलेली नाही, असेही सिन्हा म्हणाले.
असेच प्रकार सुरू राहिल्यास आम्हाला सत्य उजेडात आणता येणार नाही आणि सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील. अ‍ॅटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांनी जेपीसीपुढे सादर केलेले पुरावे आणि पंतप्रधान व अर्थमंत्री यांच्या वर्तणुकीबाबत राजा यांचे गंभीर आक्षेप आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 3:38 am

Web Title: word fight in jpc for take the pm to front of jpc
टॅग : Pm
Next Stories
1 खाणकामगारांनी अन्य नोकऱ्या शोधाव्यात
2 काँग्रेस आमदारांसमोर जयललितांची ‘गांधीवंदना’!
3 मोबाइलचा शोध १९३८ मध्ये लागला?
Just Now!
X