कर्नाटकमधील नेतृत्वबदलाच्या चर्चेला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (कर्नाटकचे प्रभारी) अरुण सिंह यांनी गुरुवारी पूर्णविराम दिला. बी. एस. येडियुरप्पा हे मुख्यमंत्री आहेत, ते उत्तम काम करीत आहेत आणि तेच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.

करोनाच्या काळात केवळ येडियुरप्पाच नव्हे तर राज्यातील मंत्री, पक्ष आणि प्रत्येकानेच उत्तम कामगिरी केली आहे. उच्चस्तरीय बैठकीत येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे सिंह यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

मुख्यमंत्र्यांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कतील यांची उचलबांगडी करण्याबाबत सुरू असलेली चर्चा अफवा आहे. येडियुरप्पांना हटविण्यासाठी कर्नाटकमधील सत्तारूढ भाजपमधील एक गट सक्रिय आहे, अशी जोरदार चर्चा सुरू होती.