गुजरातमधील गुटखा वितरकावर केलेल्या कारवाईत प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax) अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना वितरकाशी संबंधित ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये तब्बल १०० कोटींची अघोषित मालमत्ता सापडली आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी १६ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये केलेल्या कारवाईत एकूण १५ ठिकाणी धाड टाकण्यात आली. यावेळी त्यांनी नाव जाहीर केलेलं नाही.
धाड टाकण्यात आली असता जवळपास साडे सात कोटींची रोख रक्कम आणि चार कोटींचे दागिने सापडले. कंपनीने आपल्याकडे ३० कोटींची अघोषित मालमत्ता असल्याची कबुली दिल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. प्राप्तिकर विभागाने कारवाईदरम्यान अनेक कागदपत्रं तसंच डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. या पुराव्यांमधून कंपनीनकडून करचोरी झाल्याचं सिद्ध होत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, तपासात जवळपास १०० कोटींची अघोषित मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे. कंपनीने यामधील ३० कोटींची कबुली आतापर्यंत दिली आहे.
कागदपत्रांमधून कंपनीने अनेक व्यवहार अकाऊंट बूकमध्ये दाखवले नसल्याचं दिसत आहे. याशिवाय कंपनीने अनेक स्थायी संपत्तींमध्ये गुंतवणूक केल्याचेही पुरावे मिळाले आहेत. प्राप्तिकर विभागाने कंपनीचची सर्व बँक खाती गोठवली आहेत.