ढाका : म्यानमारमधील लष्करी कारवाईनंतर बांगलादेशात आश्रयास आलेल्या रोहिंग्या शरणार्थीसाठीच्या मदतीचा तिसरा टप्पा भारताने बांगलादेशकडे सुपुर्द केला असून त्यात ११ लाख लिटर केरोसिन व २० हजार स्टोव्हचा समावेश आहे. बांलागदेशमध्ये रोहिंग्या शरणार्थीची संख्या सात लाख असून त्या देशाने आंतरराष्ट्रीय समुदायाने या प्रश्नी म्यानमारवर दडपण आणण्याची मागणी केली होती. म्यानमारमधील रखाइन प्रांतात लष्कराच्या अत्याचारांमुळे सात लाख रोहिंग्या शरणार्थी बांगलादेशात आले आहेत.

भारताचे बांगलादेशातील उच्चायुक्त हर्षवर्धन श्रिंगला यांनी सोमवारी ११ लाख लिटर केरोसिन व वीस हजार स्टोव्ह बांगलादेशचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री मोफजल हुसेन चौधरी यांच्याकडे कॉक्स बझार येथे सुपुर्द केले. रोहिंग्या शरणार्थी कॉक्स बझार भागातच वास्तव्याला आहेत. बांगलादेशने मागितलेल्या मदतीनुसार हे सहाय्य करण्यात आले आहे. रोहिंग्या शरणार्थी सध्या लाकडाचे सरपण वापरत होते त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत होते. हे मदत साहित्य नंतर कॉक्स बझार येथील कुटुपलाँग येथील विस्थापित शरणार्थीना देण्यात आले.

बांगलादेश व म्यानमार कामकाजाचे सह सचिव विक्रम दोरायस्वामी यावेळी उपस्थित होते. भारताने मदतीचा तिसरा टप्पा बांगलादेशकडे सुपूर्द केला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताने ऑपरेशन इन्सानियत मोहिमेत ९८१ मेट्रिक टन मदत साहित्य देण्यात आले होते. या मदत साहित्यात तांदूळ, डाळी, साखर, मीठ, स्वयंपाकाचे तेल, चहा, नुडल्स, बिस्किटे, मच्छरदाण्या यांचा समावेश होता. त्यावेळी तीन लाख शरणार्थी तेथे होते.

मे महिन्यात ३७३ मेट्रिक टन मदत साहित्य देण्यात आले त्यात १०४ मेट्रिक टन दूध पावडर, १०२ मेट्रिक टन कोरडे मासे.  ६१ मेट्रिक टन शिशुआहार, पन्नास हजार रेनकोट, पन्नास हजार गम बूट यांचा समावेश होता. छत्तोग्राम येथे ही मदत देण्यात आली.