माजी सैनिकांकडून धैर्य आणि शौर्याच्या प्रत्यक्ष अनुभवांना उजाळा

बिपीन देशपांडे, औरंगाबाद</strong>

तापमान उणे ४० ते ५० अंश.. तोंडातील वाफेचाही बर्फ व्हायचा.. रक्तही गोठवणारे तापमान.. नसांमध्ये पाणी होणारा हॅपो (हाय अ‍ॅल्टिट्यूड पल्मरी ओडिमा) आणि फ्रॉस्ट बाईट (घामाचाही बर्फ होऊन हिमदंश होणे) या आजारांचा धोका पावलोपावली..  बर्फाच्या टेकडय़ांमधून हिमस्खलनाचा धोका तो वेगळाच.. त्यात २२ हजार फूट उंचीवरील टायगर हिल काबीज करून तेथून खालच्या काकसरा आणि दराज या गावात असलेल्या आपल्या सैनिकांच्या दिशेने गोळीबाराचा मारा करणारे पाकिस्तानी सैनिक.. या सगळ्यांशी धैर्याने ७७ दिवस लढल्यानंतर कारगिल विजय साकारला. आज त्या घटनेला वीस वर्षे झाली असून माजी सैनिकांनी  ‘लोकसत्ता’शी बोलताना युद्धकाळातील प्रत्यक्ष अनुभवांचे स्मरण केले.

कारगिल विजयाला तोड नाही म्हणून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, अशी भावना कारगिलमधील सैन्य तुकडीत प्रत्यक्ष अनेक वर्षे काम केलेल्या सैनिकांनी व्यक्त केली.

पाकिस्तानी सैनिकांनी रक्त गोठवणाऱ्या तापमानाचा आणि १९ सैनिक हिमस्खलनातून दबले गेलेल्या परिस्थितीचा फायदा घेत टायगर हिल्स या भारत-पाकिस्तान सीमेवरील टेकडीवर ताबा मिळवला होता. त्याच्यासह  नैसर्गिक आपत्तीशीही दोन हात करत भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैनिकांना टायगर हिल्सपासून पिटाळून लावण्याची कामगिरी फत्ते करून तेथे तिरंगा फडकावला तो दिवस म्हणजे २६ जुलै १९९९. त्याचे स्मरण म्हणून दरवर्षी २६ जुलै हा दिवस साजरा केला जातो. कारगिल हे ठिकाण नेमके कोठे आहे, तेथील नैसर्गिक परिस्थिती, सैनिकांना प्रत्येक क्षणाला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, यातील अनेक लहान-मोठे अनुभव प्रत्यक्ष कारगिलमध्ये राहून भारतीय सन्यदलात सेवा दिलेल्या सनिकांनी कथन केले. जखमी सनिकांवर प्रथमोपचार करण्याची सेवा केलेले माजी सैनिक अशोक संभाजी हांगे म्हणाले,की चोहीकडे बर्फाचे डोंगर. त्यातून जाणारी नागमोडी वाट. तीही एकच माणूस चालू शकेल अशी. एखादा सैनिक जखमी झाला तर त्याला पाठीवर दराज किंवा काकसरा भागातील तळापर्यंत पोहोचावे लागते. बऱ्याचवेळा रात्रीच्या वेळी हे काम चालायचे. पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबारातून दगडांचे तुकडे सैनिकांच्या शरीरातील अवयवांमध्ये घुसायचे. अशा जखमी सैनिकाला इमो ब्लाईज (अवयवाला हलू न देता) अवस्थेत पाठीवर न्यावे लागत असे. अशी जबाबदारी आमच्याकडे होती.

सैनिकांचे गाव म्हणून परिचित असलेल्या नाचनवेल येथील गजानन पिंपळे, डी. बी. शिंदे या माजी सैनिकांनीही कारगिल विजयाच्या आठवणी जागवल्या. सैनिकांना कोणत्या परिस्थितीत पाकिस्तानी सैनिकांशी लढावे लागते, असे चित्रच त्यांनी उभे केले. दुश्मनांसोबतच नैसर्गिक आपत्तीसह वातावरणातून होणाऱ्या आजारांशीही लढा द्यावा लागतो, असे त्यांनी सांगितले.

पेट्रोलही गोठले जाईल, असे तापमान होते. बर्फाळ डोंगरात अधिवास असणाऱ्या भालूसारख्या प्राण्यांचाही धोका पार करून सैनिकांना कर्तव्यावर जावे लागत असे. अशा वेळी भालूंना बुखारीसारख्या रसायनाची भीती दाखवून पळवून लावावे लागत असे. प्रत्येक टप्प्यावरील वातावरणाशी सामना देत भारतीय सैनिकांनी विजय मिळविला.

– अशोक सुरडकर, निवृत्त सैनिक