पीटीआय, बेळगाव

बेळगाव येथे कित्तूर राणी चेनम्मा प्राणिसंग्रहालयातील ३१ काळविटांचा चार दिवसांत जिवाणू संसर्गाने मृत्यू झाल्याची माहिती कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांडरे यांनी दिली. त्यामुळे या प्राणिसंग्रहालयात आता फक्त सात काळवीटच राहिले आहेत. या प्रकरणी आता उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.

गुरुवारी आठ काळविटांचा मृत्यू झाल्यानंतर शनिवारी आणखी २० जणांची त्यात भर पडली होती. मागील दोन दिवसांत आणखी तीन काळविटांचा बळी गेला आहे. या संदर्भात खांडरे यांनी प्राणिसंग्राहालयाला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. काळिटांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला जिवाणू संसर्ग नेमका कशामुळे झाला, याचा तपास केला जात असून बंगळूरुहून त्यासाठी तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. या संसर्गाचा उर्वरित काळविटांसह इतर प्राण्यांना त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याची सूचनाही अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे, अशी माहितीही खांडरे यांनी दिली.