पेट्रोल आणि डिझेलच्या अनियंत्रित किमतीवर उत्तर प्रदेशातील एका मंत्र्याने देशातील ९५ टक्के लोकांना पेट्रोल आणि डिझेलची गरज नाही, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर समाजवादी पार्टी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जोरदार पलटवार केला आहे.

उत्तर प्रदेशचे क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री उपेंद्र तिवारी म्हणाले की, ९५ टक्के लोक असे आहेत ज्यांना पेट्रोलची गरज नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. त्यांच्या या वक्तव्यावर अखिलेश यादव म्हणाले, आता मंत्र्याचीही गरज भासणार नाही कारण जनता त्यांना पायी चालण्यास भाग पाडेल. सत्य हे आहे की ९५ टक्के लोकांना भाजपाची गरज नाही. लखीमपूर खेरी येथील घटनेदरम्यान, एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये आंदोलक शेतकऱ्यांना ‘थार’ गाडीने चिरडले गेले होते. यावरुन  ‘थार’मध्ये डिझेल लागते ना?, असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला आहे. 

दररोज वाढत्या महागाईमुळे विरोधी पक्ष केंद्र सरकारवर हल्ला करत आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनीही ट्विटरवर लिहिले आहे की, “जेव्हा तुम्ही दररोज महागडे पेट्रोल आणि डिझेल खरेदी करता, तेव्हा लक्षात ठेवा मोदी सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील करातून २३ लाख कोटी रुपये कमवले आहेत. लक्षात ठेवा, या सरकारमध्ये ९७ टक्के कुटुंबांचे उत्पन्न कमी झाले, परंतु मोदीजींचे ट्रिलियनेअर मित्र दररोज १००० कोटी कमावतात.”