देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत विक्रीसाठी आणलेल्या बेकायदेशीर ९९ पिस्तुलांचा साठा दिल्ली पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी बिहारमधील मुंगेर जिल्ह्य़ातील दोघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हेगारी टोळ्यांना पुरविण्यासाठी आणलेली एवढय़ा मोठय़ा प्रमाणातील शस्त्रे जप्त करण्यात आल्यामुळे राजधानीत खळबळ उडाली आहे.
येथील सोनिया विहारजवळ मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी एक गाडी जप्त केली असून त्यामध्ये लपवण्यात आलेली पिस्तुले जप्त केली. या वेळी बेकायदेशीरपणे पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्या फिरोज आलम आणि मिश्रा या दोघांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली पिस्तूल ही बिहारमधील मुंगेर जिल्ह्य़ात बनविण्यात आली होती. तसेच अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपीही मुंगेर जिल्ह्य़ाचे रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
मुंगेर जिल्हा हा बेकायदेशीर शस्त्रे निर्मितीचे प्रमुख केंद्र मानले जाते. यापूर्वी पुणे बॉम्बस्फोटातील आरोपींकडेही मुंगेर येथील बेकायदेशीर पिस्तुले आढळून आली होती. १५ ते २० हजार रुपयांना मिळणाऱ्या या बेकायेदशीर देशी बनावटीच्या पिस्तुलांना महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली तसेच बांगलादेशातून मागणी असल्याचे समोर आले आहे.