दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) परिसरात पिस्तुल आणि काडतुसे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका काळ्या रंगाच्या बॅगेत ही शस्त्रे आढळून आली. काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास जेएनयूमधील सुरक्षारक्षकांना ही बॅग आढळून आली. या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये एक पिस्तुल, सात काडतुसे आणि एक स्क्रू ड्रायव्हर आढळून आला. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी तातडीने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अज्ञात व्यक्तीविरोधात शस्त्रास्त्र कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

jnu_1478494568

 

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जेएनयू विद्यापीठ कायम वादाच्या केंद्रस्थानी राहिले आहे. देशद्रोही घोषणांच्या प्रकरणापासून ते काही दिवसांपूर्वी विद्यार्थी बेपत्ता झाल्याच्या मुद्द्यावरून जेएनयूतील डाव्या संघटना आणि सरकारमध्ये वाद झालेले पहायला मिळाले आहेत. जेएनयूतील नजीब अहमद गेल्या २३ दिवसांपासून बेपत्ता आहे. दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना अद्याप त्याचा ठावठिकाणा शोधता आलेला नाही. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी याप्रकरणी जंतर-मंतरवर आंदोलनही केले होते. यावेळी दिल्ली पोलिसांची टीम तेथे पोहोचली आणि सर्व विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. आम्ही शांततेने आंदोलन करत असताना पोलिसांनी येथे येऊन आम्हाला बळजबरीने आपल्या वाहनात घालून पोलीस ठाण्यात नेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.