कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणाचे भूत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची पाठ सोडायला तयार नाही. या प्रकरणी विशेष न्यायालयाने सिंग यांना ‘आरोपी’ ठरवत बुधवारी समन्स धाडले. सिंग यांना न्यायालयात ८ एप्रिलपूर्वी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुन्हेगारी खटल्यात न्यायालयाने समन्स पाठवलेले मनमोहन सिंग हे दुसरे माजी पंतप्रधान आहेत. यापूर्वी दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना अशा प्रकारचे समन्स धाडण्यात आले होते.
मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात २००५ मध्ये कोळसा खाणींचे वाटप झाले होते. कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को समूहास ओडिशातील तालिबारा दोन व तीनमधील खाणींचे वितरण करण्यात आले होते. यात गैरव्यवहार झाल्याचा ठपका सीबीआयने ठेवला होता. त्यात मनमोहन सिंग यांना आरोपी करण्यात आले नव्हते. गतवर्षी ऑगस्टमध्ये सीबीआयने सादर केलेला ‘क्लोजर’ अहवाल न स्वीकारता न्यायालयाने मनमोहन सिंग यांचा जबाब नोंदवण्याची सूचना केली होती. या पाश्र्वभूमीवर मनमोहन यांना बुधवारी विशेष न्यायालयाने ‘आरोपी’ म्हणून समन्स पाठवले. मनमोहन यांच्याव्यतिरिक्त उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी. सी. पारख, िहदाल्कोचे दोन अधिकारी यांनाही गुन्हेगारी कट, फसवणूक या आरोपाखाली समन्स पाठवण्यात आले आहे.
****
विशेष न्यायालयाचे म्हणणे..
कोळसा खाणवाटपात सकृतदर्शनी गुन्हेगारी स्वरूपाची कृती झाल्याचे निदर्शनास येते. यात शुभेंदु अमिताभ, डी. भट्टाचार्य व कुमारमंगलम बिर्ला यांचा समावेश आहे. हिंदाल्कोला खाणवाटप करताना झुकते माप देण्यात आले. तत्कालीन कोळसा सचिव पी. सी. परख व कोळसा मंत्री मनमोहन सिंग यांच्या अप्रत्यक्ष प्रयत्नातून हिंदाल्कोला खाणवाटप झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे न्यायाधीश भरत पराशर यांनी नमूद केले. आहे.
****
काँग्रेस मनमोहन यांच्या पाठीशी
काँग्रेसने मनमोहन यांची पाठराखण करताना केंद्र सरकार लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आकसाने कारवाई करत असल्याचा आरोप केला. मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात कायमच पारदर्शी कारभाराला प्राधान्य दिले. कोळसा खाणवाटप प्रकरणात त्यांना विनाकारण गोवण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केली.

न्यायालयाच्या आदेशामुळे मी निराश झालो आहे. पण मला खात्री आहे की, निष्पक्ष चौकशीत मी माझे निर्दोषत्व सिद्ध करेन. अखेरीस सत्याचाच विजय होईल.
मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान