गोव्यातील बैठकीत भाजपच्या निवडणूक प्रचारसमितीच्या प्रमुखपदी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची नियुक्ती झाल्याची घोषणा हवेत विरत असतानाच नाराज लालकृष्ण अडवाणी यांनी सोमवारी पक्षाच्या तीनही प्रमुख समित्यांचा राजीनामा देत राजकीय धुरळा उडवून दिला. या धुरळ्यामुळे भाजप धुरिणांच्या तोंडाला फेस आला. अडवाणींची समजूत काढण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंहांपासून ते उमा भारतींपर्यंत सोमवारी अडवाणींच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. नाराज अडवाणींची समजूत काढण्याचे सर्व नेत्यांनी दिवसभर  प्रयत्न केले परंतु अडवाणी अडूनच राहिले. अडवाणींच्या नाराजीनामा नाटय़ामुळे भाजपवर काळजीचे ढग जमले आहेत. दरम्यान, पक्षाच्या संसदीय समितीने अडवाणींचा राजीनामा फेटाळण्याचा एकमुखी निर्णय जाहीर केला.
घटनाक्रम..
गोव्याहून सोमवारी सकाळी परतल्यानंतर राजनाथ सिंह यांनी ‘नमो’नियाग्रस्त अडवाणींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सूत्रांच्या मते खरे तर मोदी आणि राजनाथ सिंह यांना अडवाणींचे आशीर्वाद घेण्यासाठी जायचे होते. पण अडवाणींनी फक्त राजनाथ सिंह यांनाच निवासस्थानी येण्यास सांगितल्याचे समजते. राजनाथ त्यांच्या निवासस्थानी पोहोचताच अडवाणींनी थेट त्यांचा राजीनामाच राजनाथ यांच्याकडे सोपवला. त्यानंतर राजनाथ यांच्याशी त्यांनी पाऊणतास चर्चा केली.
निर्णय रविवारीच
रविवारी गोव्यात भाजपच्या निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी मोदींची नियुक्ती होत असतानाच अडवाणी यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देण्याची तयारी केली होती. पण राजनाथ सिंह दिल्लीत परतल्यानंतरच त्यांच्या सुपूर्द राजीनामा करायचा असे अडवाणींनी ठरविले होते असे समजते.
धुरळ्याचे पडसाद
राजीनाम्याचे वृत्त पसरताच भाजपचे नेते हतबुद्ध झाले. अडवाणींच्या राजीनाम्यामुळे भाजपच्या पतन होईल, अशी भीती पक्षाचे माजी अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी व्यक्त केली. अडवाणींची समजूत काढून त्यांना राजीनामा मागे घ्यायला लावण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, पक्षाचे ज्येष्ठ राष्ट्रीय सरचिटणीस अनंतकुमार, माजी राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकय्या नायडू, विजयकुमार मल्होत्रा, विजय गोयल, सुधींद्र कुलकर्णी, बलबीर पुंज आदी नेते त्यांना भेटले.

मोदींना धडा शिकवण्यासाठी..?
अडवाणी यांनी राजीनामा देत मोदींच्या वाढत्या वर्चस्वाला भाजपमध्येच शह दिल्याचे मानले जात आहे. अडवाणी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा मात्र राजीनामा दिलेला नसून रालोआची सूत्रे आपल्या हाती ठेवून त्यांनी मोदी आणि त्यांच्या भाजपमधील समर्थकांना धडा शिकविण्याची तयारी चालविली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपव्यतिरिक्त पाच पक्षांचा समावेश असलेल्या रालोआतील दोन प्रमुख पक्ष जनता दल युनायटेड आणि शिवसेना अडवाणींची पाठराखण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात भाजपमधील अंतर्गत कलह रालोआतही पसरण्याची शक्यता आहे.

मोदींकडूनही मनधरणी
नरेंद्र मोदींनीही दूरध्वनीवरून संपर्क साधत अडवाणींची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण कुठल्याही परिस्थितीत राजीनामा मागे घेणार नसल्याचे अडवाणींनी ठामपणे सांगितल्याचे समजते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी माझ्या संपूर्ण आयुष्यात जनसंघ आणि भाजपची मनोभावे सेवा केली आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मात्र, अलीकडच्या काळात पक्षाची कार्यपद्धती, पक्षाची वाटचाल यांच्याशी जुळवून घेणे माझ्यासारख्या सच्चा स्वयंसेवकाला कठीण जात आहे.