अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबान्यांच्या क्रूरतेचे किस्से सातत्याने समोर येत आहेत. काबुलमध्ये शुक्रवारी रात्री तालिबान्यांनी  गोळीबार केल्यामुळे लहान मुलांसह अनेक लोक ठार आणि जखमी झाल्याची माहिती स्थानिक अफगाण वृत्तसंस्थेने दिली आहे. दरम्यान,  तालिबानने नांगरहार प्रांतीय परिषदेचे उपप्रमुख अजमल उमर यांच्या घरावर छापा टाकला आणि त्यांचे व कुटुंबातील चार सदस्यांचे अपहरण केले आहे. इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

दरम्यान, २० वर्षांनंतर अफगाणिस्तानमध्ये सत्तेत परतलेल्या तालिबानने शुक्रवारी पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. माध्यमांच्या वृत्तांमध्ये पंजशीर देखील तालिबानच्या ताब्यात गेले आहे दावा केला जात आहे. त्यानंतर स्वतःला अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष घोषित करणारे अमरुल्ला सालेहसुद्धा पंजशीरमधून पळून गेल्याचे वृत्त समोर आलं आहे. याबाबत अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती आणि तालिबानला पंजशीरमधून आव्हान देणाऱ्या अमरुल्ला सालेह स्वतः पंजशीरमधल्या परिस्थितीची माहिती दिली आहे.

हेही वाचा – पंजशीर ताब्यात घेतल्याच्या आनंदात तालिबान्यांचा गोळीबार; लहान मुलांसह अनेकजण ठार झाल्याची माहिती

तालिबानने पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवत नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तान (एनआरएफए) चा पराभव केल्याचा दावा केल्यावर शुक्रवारी काबूलमध्ये जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामुळे लहान मुलांसह अनेक लोक ठार आणि जखमी झाल्याची माहिती स्थानिक अफगाण वृत्तसंस्था अस्वाकाने दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये लोक त्यांच्या जखमी नातेवाईकांना रुग्णालयांमध्ये घेऊन जाताना दिसत आहेत.