पीटीआय, मुंबई

देशातील प्रमुख विमानतळांवरील संप्रेषण, दिशानिर्देशन आणि देखरेख (सीएनएस) या महत्त्वाच्या यंत्रणांचे तातडीने आधुनिकीकरण करण्याची गरज आहे, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) इलेक्ट्रॉनिक अभियंत्यांच्या संघटनेने केंद्र सरकारला कळवले आहे. ‘सीएनएस’ हे ‘हवाई दिशानिर्देशन सेवा’ (एएनएस) आणि ‘हवाई वाहतूक व्यवस्थापना’चे (एटीएम) मुख्य कार्य आहे. ‘एएनएस’ आणि ‘एटीएम’ या दोन्ही यंत्रणांची कार्ये ‘एएआय’द्वारे प्रचालित केली जातात.

गेल्या आठवड्यात दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतूक नियंत्रण व्यवस्थेमध्ये त्रुटी निर्माण झाल्यामुळे किमान ८०० विमानांना विलंब झाला होता, तसेच किमान २० विमाने रद्द करावी लागली होती. त्या पार्श्वभूमीवर ‘हवाई वाहतूक सुरक्षा इलेक्ट्रॉनिक्स कर्मचारी संघटने’ने (एटीएसईपीए) हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांना ईमेल पाठवून या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच हे ई-मेल हवाई वाहतूक विभागाचे सचिव समीर कुमार सिन्हा आणि ‘एएआय’चे अध्यक्ष विपिन कुमार यांनाही पाठवण्यात आले आहे.

प्रचालन यंत्रणा विकत घेताना किंवा विकत घेताना ‘सीएनएस’ अभियंत्यांनी केलेल्या शिफारशींचा समावेश करण्यात यावा आणि ‘सीएनएस’ मनुष्यबळाचा इष्टतम वापर केला जावा अशी मागणी या ई-मेलद्वारे करण्यात आली आहे.

एटीएसईपीए’चा आरोप

आठवड्याचे सातही दिवस, २४ तास चालणाऱ्या अत्यावश्यक हवाई सेवांसाठी आवश्यक असलेल्या ‘सीएनएस’ यंत्रणेचे अद्ययावतीकरण, अतिरिक्त साधनसामग्री आणि प्रशिक्षित अभियंत्यांची तैनाती यांची गरज असल्याचे यापूर्वी अनेक वेळा इशारे देण्यात आले, प्रस्ताव पाठवण्यात आले आणि सातत्याने मागणी करण्यात आली. मात्र त्याकडे लक्ष दिले गेले नाही असा आरोप ‘एटीएसईपीए’ने या ई-मेलद्वारे केला आहे.

दिल्ली विमानतळावर अलिकडे उद्भवलेल्या प्रचालनातील अडथळ्यांमुळे एटीएसपीईएने (इंडिया) दीर्घकाळापासून उपस्थित केलेल्या गंभीर चिंता, ‘सीएनएस’ सुविधांकडे केले जाणारे दुर्लक्ष आणि ‘सीएनएस’ अभियंत्यांनी दिलेल्या तांत्रिक माहितीकडे केला गेलेला कानाडोळा या बाबी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत.- योगेंद्रे गौतम, पदाधिकारी, ‘एटीएसईपीए’