भारतीय-अमेरिकी कादंबरीकार अखिल शर्मा यांनी जगातील नामवंत लेखकांना मागे टाकून ब्रिटनमधील प्रतिष्ठेचे २०१५ चे फोलिओ साहित्य पारितोषिक पटकावले आहे. दिल्लीत जन्मलेल्या अखिल शर्मा यांच्या निम्न आत्मचरित्रात्मक अशा ‘फॅमिली लाईफ’ या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला असून, मूळ भारतीय असलेला अमेरिकेत स्थलांतरित झालेला गरीब मुलगा श्रीमंत होतो, असे त्याचे कथानक आहे.
परीक्षण समितीचे अध्यक्ष असलेले लेखक विल्यम फेनेस यांनी सांगितले की, सात पुस्तकातून ‘फॅमिली लाईफ’ या पुस्तकाची निवड केली आहे. शर्मा यांची भाषाशैली ओघवती असून काही ठिकाणी ते कौटुंबिक जीवनातील गमतीजमतीचे प्रसंगही सक्षमतेने रेखाटतात. त्यांनी सांगितले की, ‘फॅमिली लाईफ’ ही फार चांगली कादंबरी आहे. स्वार्थीपणा व जबाबदारपणा यातील तणाव, स्वातंत्र्य व संलग्नता यातील नाटय़ त्यांनी सोपेपणाने उलगडले आहे.
शर्मा (वय ४३) यांना ४० हजार पौंडांचा हा पुरस्कार फोलिओ सोसायटीच्या जीन मार्क रॅथ यांनी लंडन येथे प्रदान केला. फॅमिली लाईफ हे त्यांचे पुस्तक अमेरिकेत बेस्टसेलर ठरले असून ‘फोलिओ’ पुरस्काराने या पुस्तकाला आणखी वाचक मिळतील असे फोलिओ पुरस्काराचे सह संस्थापक अँड्रय़ू किड यांनी सांगितले.
बुकर पुरस्काराच्या यादीत घोष एकमेव भारतीय
लंडन : मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी यंदा १० लेखकांच्या नावांची अंतिम यादी तयार करण्यात आली असून त्यामध्ये अमिताव घोष या एकमेव भारतीय लेखकाने स्थान मिळविले आहे.कोलकातामध्ये जन्मलेल्या अमिताव घोष (५८) यांची ‘सी ऑफ पॉपीज’साठी २००८च्या बुकर पुरस्कारासाठीच्या यादीत निवड झाली होती. मात्र त्यांना या पुरस्काराने हुलकावणी दिली होती. बुकर पुरस्कार विजेत्याची निवड केवळ निवड मंडळच करते त्यामध्ये प्रकाशकांचा कोणताही सहभाग नसतो. लिबिया, मोझाम्बिक, ग्वाण्डेलोप, हंगेरी, दक्षिण आफ्रिका आणि कोंगो या देशांमधील अन्य लेखकांचा सदर यादीत समावेश आहे.