उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरूवारपासून अखिलेश यादव यांच्या महत्त्वाकांक्षी रथयात्रेला सुरूवात झाली आहे. मर्सिडीजच्या हायटेक रथातून अखिलेश यादव राज्यभरात यात्रा करणार आहेत. समाजवादी पक्षाने तब्बल पाच कोटी रूपये खर्ची घातलेल्या या हायटेक रथाची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. अखिलेश यादव यांच्या सुरक्षेची खबरदारी आणि अन्य गरजा लक्षात घेऊन या रथाचे डिझाईन करण्यात आले आहे. हा रथ म्हणजे प्रत्यक्षात मर्सिडीजची अत्याधुनिक उपकरणे आणि सोयीसुविधांनी युक्त असलेली हायटेक बस आहे. कार्यालय आणि अन्य कामासाठी वापरण्यात येणारा परिसर अशा दोन भागांत बसची विभागणी करण्यात आली आहे. कार्यालयीन भागात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाप्रमाणे बैठकीसाठी एक कक्ष बनविण्यात आला आहे. तर अन्य भागात किचन, विश्रांती कक्ष आणि प्रसाधनगृहाचा समावेश आहे. याशिवाय, या बसमध्ये अत्याधुनिक ध्वनियंत्रणा आणि लिफ्टही आहे. त्यामुळे अखिलेश यादव मोठ्या जनसमुदायाला बसच्या छतावर उभे राहून संबोधित करू शकतात. अखिलेश यादव सोशल ट्विटरसह सोशल मीडियावर विशेष सक्रिय असतात. त्यासाठी बसमध्ये फोरजी नेटची सुविधा पुरविण्यात आली आहे. त्यामुळे अखिलेश यादव प्रवासादरम्यान व्हिडिओ कॉलिंगद्वारे इतरांशी संवाद साधू शकतात. समाजवादी पक्षाकडून या हायटेक रथाची अधिकृत किंमत जाहीर करण्यात आली नसली तरी हा रथ तब्बल पाच कोटींचा असल्याची चर्चा आहे. याशिवाय, या बसवर पक्षाचा प्रचार करण्यासाठी विशेष एलईडी स्क्रीनची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मात्र, इतका गाजावाजा झालेला हा रथ गुरूवारी एक किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर बंद पडल्याने रथयात्रेचा फज्जा उडाला. अखेर अखिलेश यादव यांनी हा रथ जागीच सोडून आपल्या नेहमीच्या एसयुव्ही व्हॅनमधून पुढचा रस्ता धरला.