पीटीआय नवी दिल्ली

इंदूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार अक्षय कांती बम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. इंदूर मतदारसंघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी निवडणूक होणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी कांती बम यांनी अर्ज माघारी घेतला. हा प्रकार म्हणजे लोकशाहीला धोका असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. एकामागोमाग उमेदवारांना धमकावले जात आहे. निवडणूक आयोग अस्तित्वात असतानाही मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडणार का, असा प्रश्नही काँग्रेसने केला आहे.

भाजपचे खासदार शंकर लालवानी यांच्या विरोधात काँग्रेसने ४५ वर्षीय कांती बम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. परंतु कांती बम यांनी थेट उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर भाजप कार्यालयाला भेट दिली. भाजपने समाज माध्यमावर याचे छायाचित्र प्रसिद्ध केले. त्यात बम हे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा, मंत्री कैलाश विजयवर्गीय आणि पक्षाच्या इतर नेत्यांसमवेत दिसले. बम यांनी अर्ज मागे घेतल्याच्या वृत्ताला इंदूरचे जिल्हाधिकारी आशीष सिंग यांनी दुजोरा दिला.

काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या उमेदवारांना कोंडीत पकडणे, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकणे, त्यांना धमकावणे हेच सध्या घडत आहे. जे लोक लोकशाहीला कुठे धोका आहे, असा प्रश्न जेव्हा काँग्रेसला करतात, तेव्हा हाच तो धोका असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

हेही वाचा >>>विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर खटले रद्द होतात का? मोदी म्हणाले, “एकही केस…”

पक्षातून टीका

बम यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर काँग्रेसचे इंदूर शहर कार्यकारी अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी पक्षसंघटनेवर टीका केली आहे. मी येथून उमेदवारी मागितली होती. मात्र केवळ पैशाच्या जोरावर बम यांना उमेदवारी देण्यात आली. ते उमेदवारी मागे घेतील असा अंदाज होता तो खरा निघाला असा आरोप यादव यांनी केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांचा हा विभाग आहे. त्यामुळे पक्षासाठी हा धक्का मानला जातो.

काय झाले नेमके?

मध्य प्रदेशचे मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे विश्वासू सहकारी आमदार रमेश मेंडोला यांच्यासह बम यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. नंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर कांती बम यांनी भाजप कार्यालयाला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कांती बम यांचे भाजपमध्ये स्वागत असल्याचे विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.

काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर कांती बम यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकारानंतर कार्यकर्त्यांनी बम यांच्या पत्रकार कॉलनीतील निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केली होती. परंतु पोलिसांनी खबरदारी म्हणून त्यांच्या घराबाहेर चोख बंदोबस्त ठेवला.

काँग्रेसच्या अक्षय कांती बम यांच्यासह तीन उमेदवारांनी त्यांचे अर्ज आज मागे घेतले. या सर्व प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले आहे. – आशीष सिंग, जिल्हाधिकारी, इंदूर