सीरियाचे सर्वेसर्वा बशर-अल-असद यांनी रासायनिक अस्त्रांचा वापर केल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेने बुधवारी दिला. याप्रकरणी अन्य आंतरराष्ट्रीय मित्रांसमवेत अमेरिका चर्चा करत असून सीरियातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे, असे ‘व्हाईट हाऊस’चे माध्यम सल्लागार जे. कार्नी यांनी स्पष्ट केले. सीरियामधील गृहयुद्धामध्ये विरोधी गटाची सरशी होत असल्यामुळे बिथरलेले असद सरकार रासायनिक अस्त्रांचा वापर करू शकते किंवा त्याच्या प्रसाराला चालना देण्याची शक्यता आहे. असद यांनी या प्रकारची कोणतीही कृती केल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशार कार्नी यांनी दिला.  सीरियातील पेचप्रसंगावर अमेरिकेचे अध्यक्ष आणि अन्य आंतरराष्ट्रीय संस्था लक्ष ठेवून आहेत. रासायनिक अस्त्रांचे नियंत्रण अद्यापही बसर यांच्याकडे असल्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. मात्र हा अत्यंत गोपनीय विषय असल्याने याबाबत अधिक बोलणे उचित ठरणार नाही, असे कार्नी यांनी स्पष्ट केले.