ट्रॅफिक जॅमवर उपाय, गाडी आकाशामार्गाने
ट्रॅफिक जॅममध्ये अडकलात आणि पुढे जर एक किलोमीटपर्यंत वाहनांची रांग असेल तर काय कराल? काहीच नाही; हतबल होऊन गाडीतून बाहेर पडाल व बाजूला जाऊन उभे राहाल कदाचित. पण आता ही हतबलता दूर होणार आहे. अमेरिकी वैज्ञानिकांनी एक उडणारी मोटार तयार केली असून तिचे फ्लायिंग बटन दाबले की तुम्ही झूऽऽमकन आकाशात जाल; गंमत नाही, खरं आहे हे.

जननेक्स्ट गाडी
अमेरिकी वैज्ञानिकांनी ही जननेक्स्ट गाडी तयार केली असून त्यात चक्क चार माणसे बसू शकतात. साधारण दहा वर्षांत अशी मोटार बाजारात येईल असा वैज्ञानिकांना विश्वास वाटतो. अमेरिकेतील एका महत्त्वाकांक्षी अभियांत्रिकी कंपनीने या मोटारीची छायाचित्रेही दिली आहेत. चार प्रवाशांना घेऊन रस्त्यावर चालणारी व हवेतही उडू शकणारी ही गाडी आहे.

दहा ते बारा वर्षांत मोटार उडणार
टेराफुजियाचा असा दावा आहे की, ८ ते १२ वर्षांत ही मोटार प्रत्यक्ष वापरात येईल. या गाडीला सेन्सर असतील, जीपीएस मॉनिटर असतील. टीएफ-एक्स गाडीत एकूण अंतर मोजले जाऊन इंधनाचा अंदाजही घेतला जातो. आजूबाजूच्या वातावरणाची स्थिती, हवेतील मार्गिका व गाडी उतरवण्यासाठी सुयोग्य ठिकाणही शोधले जाते.ही गाडी चालवण्यासाठी पाच तासांचा सराव पुरेसा आहे असे टेराफ्युजिया कंपनीचा दावा आहे. सध्या तयार करण्यात आलेल्या उडणाऱ्या मोटारीच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

वैमानिकाचा परवानाही लागणार नाही
विशेष म्हणजे तिला उडवण्यासाठी वैमानिकाचा परवानाही लागणार नाही. टेराफ्युगियाच्या टीएफ-एक्स या उडत्या मोटारीचा उडण्याचा पल्ला  ८०५ कि.मी. असणार आहे.जेव्हा तुम्ही फ्लाइंगचे बटन दाबाल तेव्हा ती सरळ रेषेत वर उचलली जाईल व दोन प्रॉपेलरची घडी केली जाईल. नंतर कॉकपिटच्या मागच्या बाजूचे इंजिन मोटारीचा ताबा घेईल. टेक ऑफ म्हणजे उड्डाण ते प्रसंगी जमिनीवर विसावा या सर्व टप्प्यात तुम्ही काहीच करायचे नाही. सर्व स्वयंचलित असणार आहे. टीएफ-एक्स ही हायब्रिड मोटार असेल जी विजेवरही चालवता येईल.