गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बीजभाषणासाठी दिलेले आमंत्रण ‘वॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरम’ने रद्द केल्याने मोदींच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली असून त्यांनी ‘अमेरिकन्स फॉर फ्री स्पीच’ या नावाखाली गट स्थापून या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केले आहे.
मोदी यांना मज्जाव करण्याच्या निर्णयाविरोधात लोकांनी या फोरमच्या पदाधिकाऱ्यांना तसेच पेन्सिल्वेनिया विद्यापीठास पत्रे पाठवावीत, असे आवाहन या गटाने केले आहे. या गटातर्फे लवकरच एक ईमेल सोशल नेटवर्किंग साइटद्वारे जारी केला जाणार असून त्यात वॉर्टनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा तपशील दिला जाईल.
समाजातील प्रभावशाली नेते आणि अमेरिकेतील काही विद्यापीठांतील प्राध्यापक यांच्याशी चर्चा करून वॉर्टनला दिले जाणारे निवेदन तयार केले जात आहे. वॉर्टनतर्फे २३ मार्चला होणाऱ्या परिषदस्थळाबाहेरही या गटातर्फे शांततापूर्ण निदर्शने केली जाणार आहेत. वॉर्टनच्या निर्णयाने अमेरिकेतील भारतीय वंशाचे नागरिक तसेच उद्योजक नाखूश आहेत, हे स्पष्ट व्हावे, हा आमचा हेतू आहे, असे या गटातर्फे सांगण्यात आले.
वॉर्टनने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणारे मोदी यांचे भाषण रद्द केल्याचा फटका वॉर्टनलाही बसला आहे. शिवसेनेचे नेते सुरेश प्रभू तसेच लेखक व पत्रकार सदानंद धुमे यांनी वॉर्टनमधील कार्यक्रमात उपस्थित राहात नसल्याचे कळविले आहे. अडानी उद्योगाने या परिषदेचे प्रायोजकत्व करणार नसल्याचे कळविले आहे. अमेरिकन प्रतिनिधीगृहातील सदस्य एनि फालेओमावाएगा यांनीही, मूठभर विद्यार्थी व प्राध्यापक कायद्याची पायमल्ली करीत आहेत, अशी टीका वॉर्टनच्या निर्णयावर केली आहे. हेक्सवेअर टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष आणि दुसरे वक्ते अतुल निशार यांनीही आपण अन्य कार्यक्रमामुळे या परिषदेस येऊ शकत नसल्याचे कळविले आहे. हेक्सवेअरनेही आपले प्रायोजकत्व मागे घेतले आहे.
अमेरिका-भारत औद्योगिक मंडळाचे (यूएसआयबीसी) अध्यक्ष आणि या परिषदेतील आणखी एक महनीय वक्ते रॉन सोमर्स यांनीही वॉर्टनच्या निर्णयास विरोध दर्शविला आहे. हा निर्णय मोदींचा अवमान करणारा आणि दुर्दैवी तर आहेच पण विद्यार्थ्यांचीही एक संधी हुकविणारा आहे. अर्थात आपण या परिषदेस जाणार आहोत आणि विचारस्वातंत्र्याबद्दलही बोलणार आहोत, असे त्यांनी सांगितले.