Amit Shah On Delhi Red Fort blast : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एका कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. लाल किल्ला मेट्रे स्टेशनच्या गेट नंबर १ च्या बाहेर हा स्फोट झाला आहे. या घटनेत किमान ८ जणांचा मृत्यू झाला असून इतर १२ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला, असे वृत्त सरकारी सुत्रांच्या हवाल्याने हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे. दरम्यान अमित शाहांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना या स्फोटाबद्दल माहिती दिली आहे. तसेच आपण थोड्याच वेळात घटनास्थळी जाणार असल्याचेही अमित शाह म्हणाले आहेत.

अमित शाह नेमकं काय म्हणाले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, सुभाष मार्ग ट्राफिक सिग्नलवर आय २० ह्युंदाई गाडीत एक स्फोट झाला आहे. स्फोटामुळे जवळपासच्या गाड्या आणि रस्त्यावरून जाणारे लोक जखमी झाल्याची महिती आहे. प्राथमिक माहितीनुसार काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. स्फोटाची माहिती मिळताच १० मिनिटांत दिल्ली गुन्हे शाखा, दिल्ली स्पेशल ब्रांचची पथके घटनास्थळावर पोहचली आहेत. एनएसजी आणि एनआयएच्या पथकाने एफएसएलबरोबर सखोल चौकशी सुरू केली आहे.

सर्व शक्यतांचा तपास होणार

जवळपासच्या सर्व ठिकाणांचे सीसीटीव्ही कॅमेरा आणि बाकी सर्व गोष्टींच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. माझे सीपी दिल्ली आणि स्पेशल ब्रांचचे प्रभारी यांच्याशी बोलणे झाले आहे आणि हे दोघे घटनास्थळी उपस्थित आहेत. आम्ही सर्व शक्यतांचा तपास करत आहोत आणि सर्व शक्यता लक्षात घेऊन याची सखोल चौकशी होईल. चौकशीतून जे समोर येईल ते लोकांसमोर ठेवले जाईल. मी थोड्याच वेळात घटनास्थळावर जात आहे आणि रुग्णालयात देखील जाईन, असे अमित शाह म्हणाले आहेत.

पोलिस आयुक्तांनी काय सांगितले?

दरम्यान दिल्लीचे पोलीस आुयक्त सतीश गोलचा यांनी माध्यमांशी संवाद साधत घटनेची प्राथमिक माहिती दिली. सतीश गोलचा यांनी सांगितले की, आज सायंकाळी ६.५२ वाजता लाल किल्ल्याजवळून संथ गतीने जाणाऱ्या वाहनात स्फोट झाला. वाहनात त्यावेळी काही प्रवासी होते. या स्फोटामुळे आजूबाजूच्या गाड्यांचेही नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस, एफएसएल, एनआयए, एनएसजी आणि इतर यंत्रणा तात्काळ घटनास्थळी आल्या. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत.

“या घटनेचा तपास केल्यानंतर स्फोटाचे कारण काय आहे, हे सांगू. तसेच स्फोटात काही जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. नेमका आकडा काही वेळातच जाहीर केला जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोनवरून घटनेची माहिती दिली आहे. ते फोनवरून वेळोवेळी माहिती घेत आहेत”, अशी माहिती पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी दिली