टूलकिट प्रकरणावरून देशात सुरू असलेल्या चर्चेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात २२ वर्षांच्या दिशा रवीला अटक करण्यात आल्यानंतर त्यावरून दिल्ली पोलिसांना लक्ष्य केलं जात होतं. त्याविषयी बोलताना अमित शहांनी दिल्ली पोलिसांचं समर्थन केलं आहे. ‘दिल्ली पोलीस या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास करत आहेत. गुन्हा किंवा गुन्हेगार ठरवण्यामध्ये संबंधित व्यक्तीचं वय, लिंग किंवा व्यवसाय महत्त्वाचा कसा ठरू शकतो? या घटकांवरून गुन्ह्याचं स्वरूप कसं ठरवता येईल?’ असा सवाल अमित शहांनी उपस्थित केला आहे. दिशा रवीच्या वयामुळे दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर टीका केली जात आहे.

शेतकरी आंदोलनाच्या आडून कट-कारस्थान करण्यासाठीच्या कथित टूलकिट प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून देशातलं राजकारण ढवळून निघालं आहे. स्वीडीश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने हे टूलकिट ट्वीट केल्यानंतर हा वाद सुरू झाला. हे टूलकिट २६ जानेवारीला राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारासाठीची पूर्वतयारी होती या संशयावरून ग्रेटा थनबर्ग, दिशा रवी, शंतनु मुळूक, निकिता जेकब हे आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत.

‘हा कसला ट्रेंड आहे?’

यावेळी त्यांनी माध्यमांवर देखील टीका केली. ‘हा कसला ट्रेंड आहे, जिथे एखाद्या गुन्ह्याबद्दल बोलताना लोकं संबंधित व्यक्तीचं वय, व्यवसाय किंवा लिंगाविषयी बोलत आहेत? असे अनेक २२ वर्षीय लोकं आत्तापर्यंत अटक झाले असतील. दिल्ली पोलिसांनी काही पुराव्यांच्या आधारावरच अटक केली असेल’, असं ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१५ फेब्रुवारीला दिशा रवीला तिच्या बंगळुरूमधल्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. ग्रेटा थनबर्गने ट्वीट केलेल्या टूलकिटचा काही भाग संपादित केल्याचा आरोप तिच्यावर आहे. गुन्हेगारी कारस्थान आणि देशद्रोहाचा गुन्हा यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी दाखल केला आहे. दिशाची ५ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला पुन्हा ३ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.