नोकरीवरून घरी परत निघालेल्या एका २२ वर्षांच्या तरुणीवर चालत्या मोटारीमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना सोमवारी रात्री अमृतसरमध्ये घडली. चार नराधमांनी बळजबरीने संबंधित तरुणीला आपल्या मोटारीमध्ये बसविले आणि तिच्यावर बलात्कार करून नंतर तिला गाडीतून फेकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
संबंधित तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती सोमवारी संध्याकाळी आठच्या सुमारास बसस्टॉपवर उभी होती. त्यावेळी गाडीतून आलेल्या चौघांनी तिला बळजबरीने त्यांच्या गाडीत बसविले. चौघांनी गाडीमध्येच तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला गाडीतून फेकून ते चौघेही फरार झाले.
तरुणी एका मोबाईल कंपनीमध्ये काम करते. या घटनेनंतर तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे डॉक्टरांनी दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले. मात्र, तिच्या अंगावर कोठेही जखमा नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त हरजित सिंग यांनी संबंधित तरुणीच्या मोबाईमलधील कॉल्सचा तपास करण्यात येत असल्याचे सांगितले. घटना घडण्याअगोदर आणि घडल्यानंतर तिला एका ठराविक मोबाईल क्रमांकावरून सातत्याने कॉल येत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.