वृत्तसंस्था, काबूल : चिनी नागरिकांचे वास्तव्य असलेल्या मध्य काबूलमधील एका हॉटेलमध्ये सोमवारी सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार केला, अशी माहिती तालिबानच्या दोन सूत्रांनी दिल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने दिली. हा हल्ला स्थानिक वेळेनुसार दुपारी अडीचच्या सुमारास झाला. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील विदेशी सैन्याच्या माघारीनंतर अफगाणिस्तानात उसळलेल्या ताज्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा देश स्थैर्य व शांतता प्रस्थापनेसाठी धडपडत आहे.
या हॉटेलमध्ये गोळीबार सुरू असताना त्याच्या एका मजल्यावर आगही लागली. जीवितहानीची भीती सूत्रांनी व्यक्त केली. काबूलमधील एका पत्रकाराने ‘ट्विटर’वर प्रसृत केलेल्या हल्ल्याच्या चित्रफितीच्या सत्यतेस ‘रॉयटर्स’ने दुजोरा दिला आहे. काबूल पोलिसांचे प्रवक्ते खालिद झद्रान यांनी सांगितले, की जेव्हा सशस्त्र हल्लेखोरांनी सामान्य नागरिकांचे वास्तव्य असलेल्या या हॉटेलला लक्ष्य केले. सुरक्षा दलांकडून या भागाच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे.
तालिबान सरकारचे प्रवक्ते, जबिहुल्ला मुजाहिद यांनी काबूलमधील या हल्ल्यास दुजोरा दिला. परंतु अधिक माहिती देण्यास नकार दिला. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने हा हल्ला झाल्याचे वृत्त देताना म्हटले, की हा हल्ला एका चिनी अतिथिगृहाजवळ झाला आहे. काबूलमधील त्यांचा दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दूतावासाने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अलीकडच्या काही महिन्यांत अफगाणिस्तानात अनेक बॉम्बस्फोट व गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. यापैकी काही हल्ल्यांची जबाबदारी ‘इस्लामिक स्टेट’च्या दहशतवाद्यांनी घेतली होती.
चिनी राजदूतांकडून आधीच सुरक्षेची मागणी
स्थानिक रहिवाशांनी सांगितले, की जेथे बहुतांश चिनी व इतर विदेशी नागरिक वास्तव्यास असतात त्या इमारतीवर हल्ला झाला. एक शक्तिशाली स्फोटाचा आवाज आला. त्यानंतर गोळीबार सुरूच होता. चीनच्या राजदूताने अफगाणिस्तानच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांची सुरक्षेसंबंधी चर्चा करण्यासाठी भेट घेऊन चीनच्या दूतावासाच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची मागणी केल्यानंतर एक दिवसाने हा हल्ला झाला.