राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडलेल्या तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाकडून माझ्यावर चिखलफेक करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आंध्र प्रदेशला आम्ही विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली तेव्हापासून केंद्राने आमच्या विश्वसनीयतेला धक्का देण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, भाजपाने नायडूंचा आरोप फेटाळला आहे.

राज्याच्या विभाजनानंतर आम्हाला मदत आणि मार्गदर्शनाची गरज होती. त्यामुळे आम्ही रालोआत गेलो. आम्ही एकत्रित अभियान चालवले आणि लोकांना न्याय मिळेल असा विश्वास दिला. त्यामुळे लोकांनीही आम्हाला मते दिली. भाजपाबरोबर जाणे चांगले होईल, असे सर्वांनाच वाटले. मागील चार वर्षांत मी २९ वेळा दिल्लीला गेलो. पण काही खास घडले नाही. कोणतेच मोठे काम झाले नाही. आंध्र प्रदेशच्या जनतेला फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे. विद्यमान सरकार पुनर्विचार का नाही करत ? यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमावी आणि या मुद्याकडे पुन्हा पाहावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. चंद्राबाबूंनी एक माध्यमांना एक व्हिडिओही दाखवला ज्यात पंतप्रधान मोदी हे आंध्रला विशेष दर्जा देण्याबाबत बोलत आहेत. मागील ४० वर्षांत मी जो विश्वास कमावला आहे. केंद्राकडून त्याला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नायडूंच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपाने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांना मैदानात उतरवले. आंध्रला आयआयटी, इंडियन इन्स्टि्टयूट ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी, एम्स सारख्या संस्था दिल्याचा हवाला देत पोलावरम योजनेवरही केंद्र सरकार काम करत असून राज्याच्या विकासासाठी केंद्र प्रतिबद्ध असल्याचे ते म्हणाले. नायडूंच्या आरोपात गंभीरता नाही. त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवणारही नाही. भाजपा वायएसआर काँग्रेसच्या जवळ जात असल्याचा त्यांचा दावा ही धादांत खोटा असल्याचे त्यांनी म्हटले.