कोटय़वधी रुपयांच्या हवाला प्रकरणात दोषी असलेल्या आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांचे सहकारी अनिल बस्तवाडे यांना विशेष न्यायालयाने बुधवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हवालाच्या माध्यमातून बेकायदेशीर गुंतवणूक आणि आर्थिक घोटाळा प्रकरणात मधु कोडा, बिनोद सिन्हा, विकास सिन्हा, मनोज पुनमिया, अरविंद व्यास, विजय जोशी यांच्यासह अनिल बस्तवाडे हे आरोपी आहेत. आज कडेकोट पोलीस बंदोबस्तात बस्तवाडे यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
विशेष न्यायालयाचे न्या. आर. के. चौधरी यांनी बस्तवाडे यांना न्यायालयीन कोठडी सुनावून पुढील सुनावणीची तारीख ११ फेब्रुवारी निश्चित केली आहे. मधु कोडा यांचे निकटवर्तीय असलेल्या बस्तवाडे यांना आर्थिक घोटाळ प्रकरणात ‘इंटरपोल’च्या मदतीने भारतीय तपास यंत्रणांनी मंगळवारी रात्री इंडोनेशियातून भारतात आणले. आर्थिक घोटाळा प्रकरणात मधु कोडा यांना ३० नोव्हेंबर २००९ रोजी अटक करून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.