सीमेपलीकडून भारतात घडविण्यात येणाऱ्या दहशतवादी कारवाया भारत शांतपणे पाहणार नाही, असे लष्कराने शुक्रवारी पाकिस्तानला खडसावले. उभय देशांमध्ये विश्वासाचे वातावरण वृद्धिंगत होण्यास पाकिस्तान सहकार्य करील, अशी अपेक्षाही भारताने व्यक्त केली आहे. सीमेपलीकडून येणारे दहशतवादी भारतात रक्तपात घडवून आणत आहेत आणि लष्करी पातळीवर आम्ही तुमच्याशी हातमिळवणी करू, अशी तुमची अपेक्षा आहे का, असा सवाल करून लष्करप्रमुख जन. विक्रमसिंग यांनी, हे शक्य नसल्याचे पाकिस्तानला खडसावले आहे.दहशतवाद्यांवर आमचे नियंत्रण नाही, असे सांगून पाकिस्तान दुहेरी भूमिका घेत असल्याचा आरोपही विक्रमसिंग यांनी केला. एकीकडे सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया घडत असताना दुसरीकडे परस्पर विश्वास निर्माण करण्याची भाषा करणे अयोग्य आहे. त्यामुळे प्रथम अशा प्रकारांना पायबंद घालावा आणि त्यानंतरच पुढील चर्चा होईल, असेही लष्करप्रमुख म्हणाले.पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन पाकिस्तानने दिल्यासच दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते, दुहेरी भूमिकेचा अवलंब केल्यास परस्पर विश्वास वृद्धिंगत होणार नाही, असेही ते म्हणाले.काश्मीरमधून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा मागे घेण्याची वेळ नाहीनवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (एएफएसपीए) रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र एएफएसपीए हा कायदा मागे घेण्याची ही योग्य वेळ नसून त्याबद्दल राजकरणही केले जाऊ नये, असे मत भारताचे लष्करप्रमुख जन. विक्रमसिंग यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना विक्रमसिंग म्हणाले की, एएफएसपीएबाबत आम्ही केवळ सूचना करू शकतो. मात्र मला जर विचारले तर मी सांगेन की, एएफएसपीए हटवण्याची ही योग्य वेळ नाही. सध्या परिस्थितीचे अवलोकन करण्याची गरज आहे आणि सुरक्षा यंत्रणेची रचना समजून घेऊन त्यानुसार निर्णय घेतला जावा. जो काही निर्णय घेतला जाईल तो देशाच्या हिताला प्राधान्य देऊनच घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री फारूख अब्दुल्ला यांनी एएफएसपीए रद्द करण्याची मागणी केली होती. त्याबद्दल लष्करप्रमुखांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. याप्रकरणी बोलताना लष्करप्रमुख म्हणाले की, राज्य सरकारच्या मदतीने भारतीय सेना सुरक्षेबाबत योग्य त्या उपाययोजना करीत आहे.हल्लाप्रकरणी एकास अटकश्रीनगर : बेमिना परिसरात सीआरपीएफच्या तळावर बुधवारी अतिरेक्यांकडून झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर घटनास्थळाहून प्राप्त झालेल्या नोंदवहीच्या आधारे पोलिसांच्या विशेष कार्यवाही पथकाने शुक्रवारी बशीर अहमद मीर यास अटक केली. शहरात प्रवेश करण्यास तसेच हल्ला घडवून आणण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.राज्यसभेत तीव्र निषेधनवी दिल्ली: श्रीनगरमधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवर बुधवारी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा राज्यसभेत शुक्रवारी तीव्र निषेध करण्यात आला. अशा प्रकारच्या कृत्यांचा निर्धाराने मुकाबला केला पाहिजे, असे मतही या वेळी व्यक्त करण्यात आले.राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच अध्यक्ष हमीद अन्सारी म्हणाले की, श्रीनगरमध्ये बुधवारी झालेला हल्ला निंदनीय आहे .पोलिश बॅण्ड पथकाची श्रद्धांजली नवी दिल्ली : ‘न्यू बोन क्विण्टेण्ट बॅण्ड’ हा पोलंडचा वाद्यवृंद प्रथमच भारताच्या दौऱ्यावर आला असून ते आपली कला दिल्ली आणि जम्मू येथे सादर करणार आहेत. श्रीनगरमध्ये बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पाच जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा वाद्यवृंद एक गीत सादर करण्याची शक्यता आहे.आंतरराष्ट्रीय जाझ महोत्सवाचे तिसरे पर्व सुरू होत असून त्यामध्ये भारतासह अन्य १० देशांमधील वाद्यवृंद पथके सहभागी होणार आहेत.