पीटीआय, चंडीगड : Amritpal Arrest soon ‘खलिस्तान समर्थक, फुटीरतावादी अमृतपाल सिंगला लवकरच पकडले जाईल. या संदर्भात अनेक तपास यंत्रणांशी समन्वय साधला जात आहे,’ असा दावा पंजाब सरकारने मंगळवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात केला. पंजाबच्या पोलिसांनी १८ मार्च रोजी पंजाबमध्ये अमृतपाल आणि त्याच्या ‘वारीस पंजाब दे’ संस्थेच्या सदस्यांवर कारवाई सुरू केली होती. तेव्हापासून अमृतपाल बेपत्ता आहे.
सरकारने त्याला फरार घोषित केले आहे. समाजमाध्यमांतील छायाचित्रे व चित्रफितींत तो अनेक वेळा वेगवेगळय़ा वेषात दिसला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो वेशांतर करत आहे. मात्र, पोलिसांनी त्याच्या अनेक साथीदारांना पकडले आहे. मंगळवारी न्यायमूर्ती एन. एस. शेखावत यांच्या न्यायालयात अधिवक्ता इमान सिंग खारा यांनी दाखल केलेल्या कैदेतील अमृतपालला न्यायालयासमोर हजर करण्याच्या अर्जावर सुनावणी सुरू होती. या याचिकेत अमृतपाल सिंगची कथित पोलीस कोठडीतून सुटका करण्याची विनंती करण्यात आली आहे.
अमृतपालला पोलिसांनी अवैधरित्या ताब्यात ठेवल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. सुनावणीदरम्यान पंजाबचे महाधिवक्ता विनोद घई यांनी स्पष्ट केले, की अमृतपालला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
कॅनडात महात्मा गांधींच्या पुतळय़ाची मोडतोड
कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतात एका विद्यापीठाच्या आवारातील महात्मा गांधींच्या पुतळय़ाची मोडतोड करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. कॅनडात या आधी गांधीजींच्या अन्य एका पुतळय़ाला खलिस्तान समर्थकांनी लक्ष्य केल्यानंतर ही घटना घडली. सायमन फ्रेझर विद्यापीठाच्या बर्नाबी कॅम्पसच्या शांती चौकात (पीस स्क्वेअर) या पुतळय़ाची तोडफोड करण्यात आली आहे, असे व्हँकुव्हरमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले.