करोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकारचा हा निर्णय असंवैधानिक असल्याचा दावा एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला. त्याचबरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये होत असलेल्या वादावरून त्यांनी बिगर भाजपा सरकार असलेल्या राज्यांनाही फैलावर घेतलं. केंद्र सरकारनं लादलेला असंवैधानिक लॉकडाउन का स्वीकारला,” असा सवाल त्यांना राज्यांना केला.

आणखी वाचा- ठाकरे सरकार-रेल्वेमंत्री वादावरून ओवेसींनी काढले पीयूष गोयल यांना चिमटे; म्हणाले …

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आजतक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी सरकारचा लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय सपशेल अपयशी ठरल्याचा दावा केला. ओवेसी म्हणाले,”आज दिसत असलेली परिस्थिती, हे लॉकडाउन यश नाही. लॉकडाउन यशस्वी ठरलेला नाही. जगातील इतर देशाचा विचार केला, तर तिथे लॉकडाउन संपत असताना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. भारतात त्याउलट परिस्थिती आहे. भारताची अमेरिकेसोबत तुलना करता येणार नाही. केंद्रानं असंवैधानिक लॉकडाउन देशावर लादला. लोकांना त्यांची कल्पनाही दिली नाही. पैसा दिला नाही. चुकीच्या लॉकडाउनमुळे १२ कोटी लोकांचा रोजगार गेला आहे. ३५०० हजार लोकांना जीव गमवावा लागला आहे,” असं ओवेसी म्हणाले.

आणखी वाचा- मोदी त्यांचा मूड देशाला नाही तर ट्रम्प यांना सांगतात; असदुद्दीन ओवेसी यांचा सरकारवर हल्लाबोल

केंद्र सरकारनं लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मजुरांसाठी विशेष श्रमिक रेल्वे सुरू केल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या श्रमिक नाही, तर करोना रेल्वे आहे, अशी टीका केली होती. या टीकेवरून ओवेसी यांनी बिगर भाजपा पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना सुनावलं. “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज ओरडून बोलत आहे. त्यावेळी का बोलल्या नाही. भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांनी केंद्रानं लादलेला असंवैधानिक लॉकडाउन का स्वीकारला. राज्यांनी विरोध का केला नाही,” असा सवाल त्यांनी केला. “केंद्रातील भाजपा सरकारनंही सांगावं की, राज्यांना किती पैसे दिले. सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज हे एकूण जीडीपीच्या १.४ टक्केही नाही. लोक बेरोजगार होत असताना सरकार सांगत आहे की, बँकेत जाऊन कर्ज घ्या. गरिबांना बँका कर्ज देतात का? बँकांनी कर्ज दिलं असतं, तर मजुर रेल्वेमध्ये मरण पावले नसते,” अशा शब्दा ओवेसी यांनी सरकारच्या पॅकेजवर टीका केली.