‘आसिआन’ परिषदेच्या पाश्र्वभूमीवर मनिलामध्ये भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियाची बैठक
फिलिपीन्सची राजधानी मनिला येथे होत असलेल्या तीन दिवसीय ‘आसिआन’ आणि ‘ईस्ट एशिया समिट’ या परिषदांच्या पाश्र्वभूमीवर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या प्रतिनिधींची रविवारी बैठक झाली.
अधिकृतरित्या आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कायद्यावर आधारित व्यवस्था कायम राखणे, शस्त्रास्त्र प्रसार रोखणे, दहशतवादाला आळा घालणे, मुक्त व्यापार व संपर्क वाढवून समृद्धी आणणे अशी या चार देशांच्या चर्चेची उद्दिष्टय़े असल्याचे सांगितले गेले असले तरी या माध्यमातून चीनच्या वाढत्या प्रभावाला आवर घालण्यासाठी हे चार देश एकत्र येऊन रणनीती ठरवत असल्याचे मानले जात आहे.
‘आसिआन’ परिषदेत व्यापार व गुंतवणूक या विषयांना प्राधान्य असेल. तर ईस्ट एशिया समिटमध्ये सागरी सुरक्षा, दहशतवाद, अण्वस्त्र प्रसारबंदी आणि स्थलांतर आदी विषयही चर्चेला येतील. भारताचा भर या प्रदेशातील व्यापारी व सामरिक संबंध सुधारण्यावर असेल. दक्षिण चीन समुद्रातील चीनची अरेरावी आणि उत्तर कोरियाची अण्वस्त्रलालसा यांना पायबंद घालण्याबाबतही विचार होईल.
मोदींचा मनिलामधील कार्यक्रम..
- सोमवारी दुपारी मोदी यांची अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फिलिपीन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो डय़ुटर्टे यांच्याशी अधिकृत भेट
- स्थानिक भारतीय समुदायासह इंटरनॅशनल राइस रिसर्च इन्स्टिटय़ूट (आयआरआरआय) आणि महावीर फिलिपीन्स फाऊंडेशन या संस्थांन भेट
- मंगळवारी मोदी यांचे दोन्ही परिषदांमध्ये भाषण
- ‘रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप’ (आरसीईपी)च्या व्यापार आणि गुंतवणूकविषयक चर्चेतही मोदी सहभागी. ‘आरसीईपी’मध्ये ‘आसिआन’च्या १० सदस्यांसह भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सहभागी.