आसाम-मिझोरामच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना दिल्लीत पाचारण

सिलचर/ऐझॉल/नवी दिल्ली

आसाम आणि मिझोराम यांच्यातील सीमावादातून सोमवारी घडलेल्या हिंसाचाराचे तीव्र पडसाद मंगळवारी उमटले. या दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना केंद्राने बुधवारी दिल्लीत बैठकीसाठी बोलावले आहे.

आसाम-मिझोराम सीमासंघर्षांत सोमवारी सहा जणांचा मृत्यू तर ५० जण जखमी झाले होते. या रक्तपातानंतर सीमेवर शांतता असली तरी दोन्ही राज्यांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू आहेत. आपण कायद्याचे पालन करणार असून, आपल्या इंचभर भूमीवरही अतिक्रमण होऊ देणार नाही, अशी भूमिका आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी मांडली. सीमेलगतच्या संरक्षित जंगलांचा विनाश व तेथील अतिक्रमणाविरोधात आसाम सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे, असे सरमा यांनी सांगितले.

दुसरीकडे, मिझोराम सरकारने आसाम सरकारला लक्ष्य केले. मिझोराच्या हद्दीत प्रवेश करण्यापासून आसाम पोलिसांना ‘सीआरपीएफ’ने रोखले असते तर हिंसाचार रोखता आला असता, असा दावा मिझोरामचे माहिती व जनसंपर्कमंत्री लालरूतकिमा यांनी केला. ‘सीआरपीएफ’ जवानांनी आसाम पोलीस आणि नागरिकांना रोखले नाही, असे ते म्हणाले.

या सीमेवरून सुरक्षा दले मागे घेण्यास केंद्राने या राज्यांना सांगितले आहे. आम्ही सुरक्षा दले माघारी घेतली आहेत. पण, मिझोरामने तसे केलेले नाही. चौकीपासून आमची सुरक्षा दले शंभर मीटर अंतरावर आहेत, असे आसाम सरकारने म्हटले आहे.

आसाम आणि मिझोराम यांच्यातील सीमावाद जुना आहे. त्यावरून या दोन राज्यांमध्ये अनेकदा संघर्षही झाला आहे. मात्र, याआधी सोमवारप्रमाणे हिंसाचार घडला नव्हता.

केंद्राची कसोटी

आसाम-मिझोराम सीमासंघर्षांबाबत दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक होणार आहे. सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने त्यात चर्चा होणार असून, दोन्ही राज्यांनी ताठर भूमिका घेतल्याने केंद्राची कसोटी लागणार आहे.