आसाममध्ये कामरुप जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रमात नर्तकींसोबत ५०० लोकांच्या जमावाने असभ्य वर्तन केल्याचा प्रकार समोर आला. जमावाने नर्तकींनी निर्वस्त्र अवस्थेत (Strip Dance) नृत्य करावे अशी मागणी करत त्यांना विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. नर्तकींनी जमावाच्या तावडीतून कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेत तिथून पळ काढला. जमावाने नर्तकींच्या गाड्यांवर दगडफेक केली असून या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली आहे.

कामरुप जिल्ह्यातील  असोलपाडा येथे सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर करणाऱ्या मंडळाच्या संचालिकेने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, ७ जून २०१९ रोजी कुद्दूस अली नामक व्यक्तीने फोन करुन नृत्याचा कार्यक्रम सादर करण्याची विनंती केली. यासाठी ३७ हजार रुपये देण्याची तयारीही त्याने दर्शवली होती. यानुसार नर्तकी आणि अन्य सदस्य कार्यक्रमस्थळी पोहोचले. तिथे आधीपासूनच गर्दी होती. यातून मार्ग काढत त्या मंचावर पोहोचल्या. नर्तकींनी कार्यक्रम सादर करायला सुरुवात करताच जमावाने निर्वस्त्र अवस्थेत नृत्य करण्याची मागणी केली. हा जमाव इथेच थांबला नाही. त्यांनी महिलांना विवस्त्र करण्याचा प्रयत्न देखील केला. या महिलांनी अखेर तिथून स्वत:ची सुटका करुन घेतली आणि पळ काढला. जमावाने नर्तकींना घेऊन आलेल्या कारवरही दगडफेक केली.

स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार आयोजकांनी या कार्यक्रमाचे तिकीट चढ्या दराने विकले होते. पश्चिम बंगालमधील महिला निर्वस्त्र होऊन नृत्य करणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.