गुवाहाटी/ गांधीनगर : गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांनी बुधवारी उशिरा रात्री गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातून अटक केली व गुरुवारी सकाळी विमानाने गुवाहाटीला नेले. तेथून त्यांना रस्तेमार्गाने कोक्राझार येथे नेण्यात आले.
गुजरात विधानसभेत सध्या एकमेव अपक्ष आमदार असलेले मेवानी यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये काँग्रेसबाबत निष्ठा व्यक्त केली होती. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नसला, तरी पुढील निवडणूक आपण काँग्रेसच्या तिकिटावर लढणार असल्याचे सांगितले आहे.
गुजरात व आसाम पोलिसांनीही या अटकेच्या बातमीला दुजोरा दिला आहे, मात्र त्यांनी अधिक तपशील दिले नाहीत.
मेवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या एका ट्वीटबाबत कोक्राझार येथील भाजपच्या एका स्थानिक नेत्याने केलेल्या तक्रारीच्या आधारे मेवानी यांना अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मेवानी यांचे अलीकडचे ट्वीट ‘एका कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून भारतात स्थगित करण्यात आले आहेत’, असे त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दिसत आहे.
आमच्याकडे फारशी माहिती नाही, मात्र माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्ह्यासाठी आसाम पोलिसांनी त्यांना अटक केली आहे, असे बनासकांठाचे पोलीस अधीक्षक अक्षयराज मकवाना यांनी सांगितले. मेवानी यांना आदल्या रात्री गुजरातमध्ये अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला कोक्राझार येथील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेही दुजोरा दिला. मात्र, आपण याबद्दल अधिक काही सांगू शकत नसल्याचे तो म्हणाला. आसामचे पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांनीही वारंवार केलेल्या दूरध्वनींना प्रतिसाद दिला नाही. सूत्रांच्या मते, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोडसे यांना देव मानतात’, असे ट्वीट मेवानी यांनी केले होते. या ट्वीटविरुद्ध बोडोलँड टेरिटोरियल कौन्सिलचे (बीटीसी) भाजपचे कार्यकारी सदस्य अरूपकुमार डे यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.
