पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जून रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर चीनचेही अनेक सैनिक ठार झाले. पण चीनने अद्यापपर्यंत अधिकृतपणे त्यांचे सैनिक ठार झाल्याचे मान्य केलेलं नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला मोल्डोमध्ये भारत आणि चीनमध्ये लष्करी-मुत्सद्दी पातळीवरील चर्चा झाली.
त्यात पहिल्यांदाच चीनने गलवान खोऱ्यातील संघर्षात आपले सैनिक ठार झाल्याचे मान्य केले. १५ जूनच्या संघर्षात आपले पाच सैनिक ठार झाल्याची कबुली चीनने दिली आहे. सरकारी सूत्रांच्या हवाल्याने न्यूज १८ ने हे वृत्त दिले आहे. चीनने पहिल्यांदाच त्यांच्या बाजूला ठार झालेल्या सैनिकांचा आकडा सांगितला आहे. गलवान नदीजवळ १५ हजार फूट उंचीवर झालेल्या या संघर्षात चिनी सैन्याचा कमांडिंग ऑफिसरही ठार झाल्याचे याआधी चीनने मान्य केले होते, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
लडाखमध्ये चीन अशा पद्धतीने सुरु करु शकतो युद्ध, IAF चा हल्ला ठरेल निर्णायक
या चर्चेची पूर्ण कल्पना असलेल्या साऊथ ब्लॉकमधील वरिष्ठ सरकारी सूत्रांनुसार, चीनच्या बाजूचा आकडा खूप जास्त आहे. चीनने पाच ही संख्या सांगितली असेल, तर त्याचा तीनने गुणाकार करा असे सूत्रांनी सांगितले. भारतीय गुप्तचरांच्या अंदाजानुसार गलवान खोऱ्यातील संघर्षात चीनचे जवळपास ४० सैनिक ठार झाले. अमेरिकेतील रिपोर्ट्नुसारही या संघर्षात चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले आहेत. पण चीनने त्याचा स्वभाव आणि सवयीप्रमाणे अद्यापपर्यंत त्यांच्याबाजूला झालेले नुकसान मान्य केलेले नाही.
लडाख सीमेवर एप्रिलपासून निर्माण झालेली तणावाची स्थिती अजूनही कायम आहे. उलट पँगाँग सरोवराच्या परिसरात स्थिती जास्त स्फोटक आहे. इथे दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहे. आतापर्यंत तीन वेळा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. चीन फिंगर चार वरुन त्यांच्यापूर्वीच्या जागी फिंगर आठवर जायला तयार नाही. त्यामुळे ही संघर्षाची स्थिती आहे.