तामिळसमर्थक कार्यकर्त्यांच्या एका गटाने गुरुवारी येथील अरविंद आश्रमावर हल्ला करून तेथील लाकडी सामानाची मोडतोड केली आणि खिडक्यांच्या काचाही फोडल्या. इतकेच नव्हे तर आश्रमाच्या पहारेकऱ्यालाही मारहाण करून जखमी केले.
सदर कार्यकर्ते पेरियार द्रविड कळहम गटाचे होते आणि त्यांनी आश्रमातील फुलांच्या कुंडय़ा फोडल्या आणि सूचना फलक व मुख्य द्वारावरील घडय़ाळही फोडले, असे पोलिसांनी सांगितले. या वेळी तामिळ समर्थनाच्या घोषणा देण्यात आल्या. या हल्ल्याचे निश्चित कारण समजू शकले नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
आश्रमात जबरदस्तीने प्रवेश करण्यापूर्वी तामिळ समर्थकांनी पहारेकऱ्याला मारहाण केली त्यामध्ये त्याच्या डोक्याला इजा झाली आहे. हल्ला करण्यात आला तेव्हा कोणताही भक्त आश्रमात नव्हता. या संदर्भात पेरियार द्रविड कळहमच्या २० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.