सर्वोच्च न्यायालयाकडून भारत स्टेज ३ (बीएस ३) मानके असलेल्या इंजिनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्याने वाहननिर्मिती क्षेत्राचे तब्बल १२०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. एसआयएएम या स्वयंचलित वाहन उत्पादक संघटनेने यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे.

वाढत्या प्रदूषणावर आळा बसण्यासाठी सरकारने वाहनांवरील बीएस-३ बंदीचा प्रलंबित निर्णय अचानक जाहीर केला होता. १ एप्रिल २०१७ पासून कोणत्याच प्रकारच्या बीएस-३ इंजिन असलेल्या वाहनाची विक्री करता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काढले होते. त्यामुळे धास्तावलेल्या वाहन विक्रेत्यांनी बीएस-३ इंजिन असलेली वाहने सवलतीच्या दरात विक्रीस काढली होती. परिणामी देशभरात वाहन खरेदीसाठी अनेक ‘शोरुम’बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.

दिल्लीतील प्रदूषणासाठी वाहने मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर भारतातील सर्वच शहरात प्रदूषणासाठी वाहने हा घटक मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत असल्याचे समोर आले होते. त्याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषण कमी करण्यासाठी म्हणून ‘बीएस-३’ म्हणजेच ‘भारत स्टेज तीन’ इंजिन बंदीचा निर्णय घेतला होता.