सगळ्यांचं लक्ष सध्या करोनाच्या औषधाकडे लागलं असून, पतंजलीनं करोनावर आयुर्वेदिक औषध शोधून काढलं आहे. हे औषध करोनावर गुणकारी असल्याचा दावा पतंजलीनं केला आहे. हे औषध पतंजलीनं बाजारात आणलं असून, काही तासातच पतंजलीला धक्का बसला आहे. केंद्र सरकारनं करोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश पतंजलीला दिले आहेत.

देशात आणि जगभरात करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचबरोबर करोनावर औषध शोधण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत करोनावर काही प्रमाणात परिणाम करणारी वेगवेगळी औषधी शोधून काढण्यात आले असून, योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं करोनावरील आयुर्वेदिक औषध ‘करोनिल’ शोधून काढलं आहे. योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या उपस्थितीत हे औषध जगासमोर आणण्यात आलं. हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ आजच (२३ जून) लाँच करण्यात आलं.

हे औषध बाजारात आणण्यात आल्यानंतर पतंजलीनं त्यांची जाहिरात करण्यासही सुरूवात केली आहे. हे औषध घरपोच पोहोचवण्यासाठी अॅप आणण्याची तयारी पतंजलीकडून सुरू असतानाच केंद्र सरकारकडून पतंजलीला मोठा धक्का बसला आहे. केंद्र सरकारनं पतंजलीला करोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले आहेत. “या औषधाची चाचणी होईपर्यंत जाहिरात थांबवण्यात यावी, असं केंद्र सरकारनं पतंजलीला दिलेल्या आदेशात म्हटलं आहे.

सात दिवसांत शंभर टक्के रुग्ण बरा होण्याचा दावा

“संपूर्ण देश आणि जग ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होता तो क्षण आता आला आहे. करोनावरील पहिलं आयुर्वेदिक औषध तयार करण्यात आलं आहे. या औषधाच्या मदतीं आम्ही करोनाच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीवर नियंत्रण ठेवू शकू, असं मत बाबा रामदेव यांनी यावेळी व्यक्त केलं. या औषधाच्या साहाय्यानं तीन दिवसांच्या आत ६९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर ७ दिवसांमध्ये १०० टक्के रुग्णांनी करोनावर मात केली आहे. या औषधाची चाचणी २८० जणांवर करण्यात आली,” असंही ते म्हणाले.