उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या वक्तव्यांमुळे धमक्या मिळत असल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी केला आहे. त्यामुळे त्याच्या निषेधार्थ राजभवनावर आयोजित चहापानावर त्यांनी बहिष्कार टाकला.
मुख्य माहिती आयुक्तांच्या शपथविधीच्या निमित्त राज्यपालांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आझम खान चहापानाला उपस्थित नव्हते, असे विचारता तुम्ही चहा घेतला असेल, तेव्हा उत्तम व्यवस्था होती हे त्यांना सांगा, असे पत्रकारांना सांगत राम नाईक यांनी आझम यांना टोला लगावला. राज्यपाल हे भाजप व केंद्र सरकारचे प्रतिनिधी असल्यासारखे वावरत असून वातावरण खराब करत असल्याचा आरोप आझम खान यांनी केला होता. याबाबत राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘राज्यपालांविरुद्ध वक्तव्ये करणे आझम खान  यांनी टाळावे’
आझमगड: उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक हे घटनात्मक पदावर असल्याने सपाचे नेते आझम खान यांनी त्यांच्याविरुद्ध वक्तव्य करणे टाळावे, अशी सल्लावजा सूचना सपाचे माजी नेते अमरसिंह यांनी केली आहे.  आझम खान हे सपाचे नेते मुलायमसिंह यांचे निकटचे सहकारी आहेत आणि त्यांच्यामुळेच आपली आणि जया प्रदा यांची सपातून हकालपट्टी झाली असा आरोप केला. राजकारणात आपली पुढील भूमिका काय, असे विचारले असता अमरसिंह म्हणाले , मुलायमसिंह आणि अखिलेश यांच्याशी आपले कोणतेही मतभेद नाहीत. मुलायमसिंह हे आपल्याला मोठय़ा भावासारखे आहेत तर अखिलेश हे पुत्राप्रमाणे आहेत. याच भूमिकेतून सदर दोघे पुढे आल्यास आमची चर्चा होऊ शकते असे स्पष्ट केले.