रामदेव बाबा सध्या वेगवेगळ्या गोष्टींवरुन सातत्याने चर्चेत राहण्याच्या प्रयत्नात असल्याचे आपल्याला दिसते. या चर्चेत आणखी एक भर पडली असून, रामदेव बाबा यांनी बुधवारी मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट नेमकी कशासाठी होती याचे कारण मात्र अजून गुलदस्त्यातच आहे.

एकीकडे वेगवेगळ्या चळवळी, पतंजलीसारख्या उत्पादन निर्मितीमध्ये अग्रणी स्थान मिळवत असतानाच रामदेव बाबा यांना राजकारणही खुणावते की काय, अशी चर्चा कायमच असते. त्यादृष्टीने या भेटीकडे पाहिल्यास वावगे ठरणार नाही. राजकारण आणि योग या विषयांवर चर्चा करण्यासाठी बाबा रामदेव यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

बुधवारी सकाळी साधारण पाऊणेनऊच्या सुमारास बाबा रामदेव राज ठाकरे यांच्या मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर त्यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा रंगली. मात्र या चर्चेचा नेमका विषय अद्याप स्पष्ट होऊ शकलेला नाही. ही सदिच्छा भेट असल्याचेही राज ठाकरे यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. भाजप आणि बाबा रामदेव यांची जवळीक माहिती असतानाच अशाप्रकारे राज ठाकरे यांची सदिच्छा भेट कशासाठी यावर चर्चांना उधाण आले आहे.