उत्तराखंडमध्ये अडकलेल्या गुजराथी नागरिकांच्या सुटकेसाठी विशेष व्यवस्था केल्याचा नरेंद्र मोदी सरकारचा दावा म्हणजे केवळ ‘चीप पब्लिसिटी स्टंट’ असल्याचा आरोप गुजरातमधील एका सरकारी अभियंत्याने केला. महेश मेवाडा असे या अभियंत्याचे नाव असून, गुजरात सरकारच्या रस्ते आणि इमारत बांधणी विभागात ते कार्यरत आहेत. मेवाडा आपल्या कुटुंबीयांसह केदारनाथला गेले होते. तेथून गुजरातला परत येण्यासाठी त्यांना कसा त्रास सहन करावा लागला, याचा अनुभव सांगत त्यांनी मोदी सरकारच्या दाव्यांवर टीका केली.
मेवाडा आपली पत्नी हर्षा, मुलगी रिद्धी यांच्यासह अन्य काही मित्रांसोबत आठ जूनला गुजरातमधून केदारनाथसाठी रवाना झाले. १६ जूनला ते केदारनाथमध्ये होते. त्याचदिवशी केदारनाथमध्ये महाभयंकर पूर आला. पूरस्थितीत सापडल्यानंतर आम्ही कसेबसे रामवाड्याला आलो. तिथून हेलिकॉप्टरच्या साह्याने आम्हाला फाट्याला आणण्यात आले. रामवाड्यातून आमची सुटका करताना साधं पाणीसुद्धा देण्यात आले नाही. त्यानंतर २२ जूनला आम्ही हरिद्वारला पोचलो, असे महेश मेवाडा यांनी सांगितले. हरिद्वारमध्ये आम्ही गुजरात सरकारने उभारलेल्या छावण्यामध्ये राहिलो. हरिद्वारमध्ये येईपर्यंत आम्हाला कुठेही गुजरात सरकार त्यांच्या राज्यातील नागरिकांच्या सुटकेसाठी काही वेगळे प्रयत्न करीत असल्याचे दिसले नाही, असा आरोप मेवाडा यांनी केला.
हरिद्वारहून आम्हाला लवकर अहमदाबादला जायचे असल्याने आम्ही स्वतंत्र विमानाने जाण्याची तयारी करीत होतो. मात्र, हरिद्वारमध्ये असलेल्या गुजरात सरकारच्या अधिकाऱयांनी आम्हाला राज्य सरकारच्या विशेष विमानातून मोफत अहमदाबादला नेण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर दोन-तीन तास काहीच घडले नाही. त्यानंतर आम्हाला विशेष विमान रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अखेर आम्हाला रेल्वेतून अहमदाबादला परतावे लागले, असे महेश मेवाडा म्हणाले.