दोघांना ताब्यात घेतले

येथील एका दुकानातून ‘आय लव्ह पाकिस्तान’ असा मजकूर छापलेले फुगे जप्त करण्यात आले असून या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

येथील गोविंदनगर परिसरात पोलिसांनी छापा टाकून आय लव्ह पाकिस्तान आणि हबीबी (माय लव्ह) असा मजकूर छापलेल्या फुग्यांची पाकिटे विक्रेत्याकडून जप्त केली, असे पोलिसांनी सांगितले. एका प्रोव्हिजन स्टोअर्समध्ये या फुग्यांची विक्री केली जात होती.

हिंदू युवा वाहिनीशी संबंधित वकील अजय प्रताप सिंह हे आपल्या मुलाच्या वाढदिवसासाठी फुगे खरेदी करण्यासाठी त्या दुकानांत गेले असता त्यांना आय लव्ह पाकिस्तान आणि हबीबी असा मजकूर लिहिलेले फुगे आढळले, असे शहर पोलीस अधीक्षक अशोक वर्मा यांनी सांगितले.

अजय प्रताप सिंह यांनी याची माहिती तातडीने गोविंदनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करून किरकोळ विक्रेत्याला ताब्यात घेतले. त्याला फुग्यांचा पुरवठा करणाऱ्यांची नांवे सनी आणि समीर अशी असल्याची माहिती मिळाली आहे. हे फुगे दिल्लीच्या सदर बाजारातील ‘गुब्बारेवाली गली’ या मोठय़ा बाजारपेठेतून आणण्यात आले आहेत, असे त्यांनी चौकशीत सांगितले. त्यामुळे तपासासाठी तेथे पथक पाठविण्यात आले आहे. अशा प्रकारची कोणतीही घटना आढळल्यास त्याबाबत पोलिसांना तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन कानपूरचे पोलीस महानिरीक्षक आलोक सिंह यांनी जनतेला केले आहे.