पीटीआय, नवी दिल्ली
‘‘लोकशाही प्रक्रियेतून निवडून न आलेल्या सरकारने स्थापन केलेल्या फसव्या लवादाने हा निर्णय दिला आहे,’’ अशी प्रतिक्रिया बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी लवादाच्या निर्णयावर दिली आहे. ‘‘लवादाच्या राजकीयदृष्ट्या प्रेरित निर्णयामुळे हंगामी सरकारमधील अतिरेकी व्यक्तींचा माझ्या आणि माझ्या पक्षाविरोधातील निर्लज्ज आणि खुनी हेतू उघड झाला आहे,’’ असे त्या म्हणाल्या.
बांगलादेशमधील लवादाच्या निर्णयानंतर हसीना यांनी तीव्र शब्दांत आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, ‘‘लवादापुढे माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप मी फेटाळते. बांगलादेशमध्ये निवडून आलेल्या शेवटच्या पंतप्रधान आणि अवामी लीग नावाचे राजकीय बळ संपुष्टात आणण्याचा हा प्रयत्न आहे.” आपल्यावर आरोप करणाऱ्यांनी पुराव्यांची योग्य शहानिशा होईल, अशा लवादाकडे जाऊन न्याय मागावा, तेथे सुनावणीसाठी आपण घाबरत नाही, असे हसीना सांगितले. यामुळेच आपण हेगमधील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयासमोर खटला चालवण्याची मागणी केली होती, असे त्यांनी नमूद केले.
सध्याच्या हंगामी सरकारच्या काळात नागरी सेवा आणि न्यायव्यवस्था संपुष्टात आल्याची टीका हसीना यांनी केली. तसेच हिंदू अल्पसंख्याकांवर हल्ले झाल्याकडे आणि महिलांचे अधिकार संपवल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. प्रशासनातील मूलतत्त्ववादी बांगलादेशचा धर्मनिरपेक्ष चेहरा पुसून टाकत आहेत, अशी चिंता शेख हसीना यांनी व्यक्त केली. कोट मला न्यायालयात माझी बाजू योग्यपणे मांडण्याची संधी दिली नाही. तसेच, मला हवे असलेले वकीलही मला नेमू दिले नाहीत. मोहम्मद युनुस यांच्या अराजकी, हिंसक आणि सामाजिकदृष्ट्या प्रतिगामी प्रशासनाच्या कारभारामध्ये लक्षावधी बांगलादेशी त्रस्त आहेत. अशा निर्णयांमुळे तुम्ही बांगलादेशींचा लोकशाही हक्क हिरावून घेऊ शकत नाही. – शेख हसीना, माजी पंतप्रधान, बांगलादेश
