बांगलादेशातील एक खासदार भारतात उपचार घेण्यासाठी आले होते. मात्र, मागील आठ दिवसांपासून ते बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, बुधवारी (ता. २२ मे) कोलकाता येथील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. खासदार अन्वारुल अझीम अनार असं त्यांचं नाव असू ते बांगलादेशचा सत्ताधारी पक्ष अवामी लीगचे खासदार आहेत, अशी माहिती समोर येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृत्तानुसार, खासदार अन्वारुल अझीम अनार हे १२ मे रोजी उपचार घेण्यासाठी कोलकाता येथे आले होते. त्यानंतर त्यांचा फोन १३ मे पासून बंद येत होता. त्यामुळे ते आलेल्या दुसऱ्या दिवशीच बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह कोलकाता येथील एका फ्लॅटमध्ये आढळून आला. या घटनेला कोलकाता पोलिसांच्या हवाल्याने बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी दुजोरा दिला आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

हेही वाचा : “रावण डॅशिंग होता म्हणून…”, पटोलेंच्या आदित्यनाथांवरील टीकेला आठवलेंचं उत्तर; म्हणाले, “रावणाने लंका जाळली…”

खासदार अन्वारुल अझीम अनार हे बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा फोन बिहारच्या परिसरात बंद झाला. यानंतर आता पोलीस या घटनेची चौकशी करत असून कोलकाता येथील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहेत.

दरम्यान, खासदार अन्वारुल अझीम अनार हे बांगलादेशातील सत्ताधारी पक्ष अवामी लीग या पक्षाचे खासदार होते.अन्वारुल अझीम अनार हे तब्बल चार वेळा खासदार म्हणून निवडणून आले होते. अन्वारुल अझीम अनार हे कोलकाता येथील एका मित्राच्या घरी भेटण्यासाठी गेले असल्याचीही माहिती सांगितली जात आहे. ते येथून डॉक्टरांकडे उपचारासाठी जायचं असं सांगून बाहेर पडले. मात्र, त्यानंतर ते दिल्लीकडे गेले असल्याची माहिती समोर आली.

बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी या वृत्ताला दुजोरा देताना सांगितलं की, आम्हाला या प्रकरणामध्ये त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे. हे सर्व प्रकरण संशयास्पद आहे. त्यामुळे या संदर्भात योग्य ती चौकशी करण्यात येईल. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू असून या प्रकरणात ३ संशयीतांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्यांचा ज्या फ्लॅटमध्ये मृतदेह आढळून आला तेथे येणाऱ्या जाणाऱ्यांचीही चौकशी पोलिसांकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. बांगलादेश सरकार या घटनेचा अहवाल मागवण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh mp anwarul azim anar dead in kolkata india marathi news gkt