गुरूनानक जयंतीच्या एका दिवसाच्या सुट्टीनंतर आजपासून पुन्हा देशभरातील बँकाचे व्यवहार सुरू होणार आहेत. मोदी सरकारने लागू केलेल्या ५०० आणि १००० रूपयांच्या नोटबंदीनंतर देशभरात चलनाचा तुटवटा निर्माण झाला आहे. त्यामुळे बँकांच्याबाहेर पैशांसाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. आजदेखील काहीसे अशाचप्रकारचे चित्र पाहायला मिळू शकते. काल बँकांचे व्यवहार बंद होते. परिणामी एटीएममधून पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, बँका आज उघडणार असल्याने मुंबईत विविध ठिकाणी स्थानिकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांतील परिस्थिती पाहता रिझर्व्ह बँक आणि सरकारकडून काही तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बँकांबाहेर होणारी गर्दी पाहता यापुढे बँकाबाहेर चार रांगा लावण्यात येणार आहेत. पैसे काढण्यासाठी, पैसे भरण्यासाठी, दिव्यांगांसाठी आणि वयोवृद्ध व्यक्तींसाठी चार स्वतंत्र रांगा असतील.

याशिवाय, बँका आणि एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. येत्या ३० डिसेंबरपर्यंत ग्राहकांना कोणत्याही बँकेचे एटीएम विनाशूल्क वापरता येणार आहे. याचा अर्थ ग्राहकाला ३० डिसेंबरपर्यंत आपल्याकडील एटीएमने कोणत्याही बँकेच्या एटीएममधून कितीही वेळा पैसे काढता येतील. याशिवाय, महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ५० किलोपर्यंतच्या शेतमालाची वाहतूक विनाशुल्क करता येणार आहे. तसेच रेल्वेने सोमवारी जुन्या ५०० व हजार रूपयांच्या नोटा स्वीकारण्याचा कालावधी वाढवला आहे. सरकारने बंद केलेल्या नोटांचा उपयोग २४ नोव्हेंबरपर्यंत तिकिट खरेदी करणे तसेच ऑनबोर्ड केटरिंगसाठी वापरण्याची मुभा दिली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी नागरी उड्डाण मंत्रालयाने सर्व विमानतळांवर २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पार्किंग शूल्क माफ केले आहे. लोकांपर्यंत रोख रक्कम लवकर पोहोचावी म्हणून मायक्रो एटीएम येणार आहेत. तसेच एटीएममधून पैसे काढण्याची दैनंदिन मुदत २००० रूपयांवरून २५०० रूपयांपर्यंत करण्यात आली आहे.

ज्या ग्राहकांचे चालू खाते (करंट) तीन महिन्यांपासून सक्रिय आहे. त्यांना आपल्या खात्यातून एका दिवसांत ५० हजार रूपयापर्यंत व्यवहार करता येईल. सरकारने सर्व औषध दुकाने, पेट्रोल पंप, विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि टोल नाक्यांवर जुन्या नोटा स्वीकारण्यास २४ नोव्हेंबरपर्यंत परवानगी दिली आहे. बँकेतून नवीन नोटा घेण्यासाठी असलेली ४००० रूपयांची मर्यादा ४५०० पर्यंत वाढवण्यात आली आहे. बँकेतून एका दिवसाला १० हजार रूपये काढण्याची मर्यादा संपुष्टात आणून आठवड्याला २४ हजार रूपये पर्यंत करण्यात आली आहे. बँकेत पैसे जमा करण्यासाठी आलेले आणि नोट बदलण्यासाठी आलेल्या नागरिकांची वेगळी रांग करण्यात येईल. राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर १८ नोव्हेंबरपर्यंत टोल माफी असेल. बँकेत नोटा पोहोचवण्यासाठी हवाई दलाची मदत घेतली आहे. यासाठी विमान ग्लोब मास्टरचा वापर करण्यात आला आहे.