श्रीनगर : सततच्या दहशतवादी हल्ल्यांमुळे असलेले भयग्रस्त वातावरण आणि ९०च्या दशकापासून प्रत्येक वेळी दिले जाणारे निवडणूक बहिष्काराचे इशारे या दोन्हींना बाजूला सारून बारामुल्ला मतदारसंघात उत्साहाने मतदान पार पडले. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांच्यासह २२ उमेदवार रिंगणात असलेल्या बारामुल्लामध्ये सोमवारी आजवरच्या लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक ५९ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली.

अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या गेलेल्या बारामुल्लामध्ये २०१९मध्ये ३४.६ टक्के मतदान झाले होते तर १९८९मध्ये ५.४८ मतदानाची नोंद झाली होती. मात्र, सोमवारी मतदारांनी उत्स्फुर्तपणे सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. बारामुल्ला, कुपवाडा, बांदीपोरा, बडगाम या चारही जिल्ह्यांमधील दोन हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर हा उत्साह पाहायला मिळाल्याचे निवडणूक आयोगाने एका निवेदनात म्हटले.

हेही वाचा >>> अल्पसंख्याकांविरुद्ध अवाक्षरही काढले नाही पंतप्रधान मोदी

अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर प्रथमच निवडणुकीला सामोरे जात असलेल्या काश्मीरमधील श्रीनगर मतदारसंघात निवडणुकीच्या आधीच्या टप्प्यात ३८ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. मात्र, बारामुल्लामधील मतदारांनी तो विक्रम सहज मोडित काढला. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला, पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सजाद गनी लोण, कारागृहातून निवडणूक लढवत असलेले आवामी इत्तेहाद पार्टीचे ‘इंजिनिअर रशिद’ आदी उमेदवार येथून रिंगणात आहेत.

लडाखमध्ये ६८ टक्के मतदान

केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्येही मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. येथे सायंकाळी पाच वाजेपर्यंतच मतदानाची आकडेवारी ६८.४७ टक्क्यांवर पोहोचली होती. हा आकडा ७५ टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. काही दिवसांपूर्वीच लडाखला राज्य दर्जा बहाल करण्याच्या मागणीसाठी ६६ दिवस उपोषण करणारे प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी लेह जिल्ह्यातील उल्यक्तोपो गावातून मतदान केले.

आवाज उठवण्यासाठीच मतदान

बारामुल्लामध्ये उत्साहाने मतदानासाठी आलेल्या अनेक मतदारांनी स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्यास प्राधान्य दिल्याचे सांगितले. बेरोजगारी, विजेची वाढीव देयके, रस्त्यांची अवस्था आदी समस्या मतदारांसाठी कळीचा मुद्दा ठरला. त्याचवेळी जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात, यासाठीही मतदान करत असल्याचे काही मतदारांनी सांगितले.