बिहारमधील नालंदा येथे धावत्या बसने पेट घेतल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. या आगीत होरपळून आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १२ प्रवासी जखमी झाल्याचे समजते. बिहार सरकारने आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
नालंदा जिल्ह्यातील हरनौत बाजार येथे संध्याकाळी पाचच्या सुमारास धावत्या बसने अचानक पेट घेतला. बाबा रथ ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीची ही बस होती. आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केल्याने परिस्थिती बिकट झाली. स्थानिकांच्या मदतीने अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या घटनेमुळे परिसरात गोंधळाची स्थिती होती. प्राथमिक माहितीनुसार बसमधील इंजिनवर ज्वलनशील पदार्थ ठेवण्यात आले होते. इंजिन गरम झाल्याने ज्वलनशील पदार्थाने पेट घेतला आणि काही क्षणातच आग पसरत गेली असे समजते. मात्र या वृत्ताला अद्याप अग्निशमन दलाकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. बस पाटण्याहून शेखपुरा येथे जात होती. बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते असे समजते. घटनेतील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे.
बिहार सरकारनेही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ४ लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकारतर्फे करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
#Visuals from Bihar: Bus caught fire in Nalanda's Harnaut, Bihar govt announces ex-gratia of Rs 4 lakh for the kin of each of the 8 killed. pic.twitter.com/TywtyIE7wQ
— ANI (@ANI) May 25, 2017