पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोमवारी म्हणजेच २७ सप्टेंबर २०२१ रोजी आयुष्मान भारत डिजिटल योजना कार्यान्वित करण्यात आली. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी आयुष्मान भारत डिजिटल योजना क्रांतिकारक बदल घडवील, असा आशावाद व्यक्त केला. या योजनेत लोकांना डिजिटल हेल्थ आयडी दिला जाणार असून त्यात आरोग्याविषयक नोंदी असतील असे त्यांनी स्पष्ट केले. भारत सरकारच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या या योजनेसाठी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’चे बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं आहे. ट्विटरवरुन बिल गेट्स यांनी यासंदर्भातील प्रतिक्रिया नोंदवली आहे.

नक्की पाहा >> बिल गेट्स सेकंदाला कमावतात १२ हजार; एकूण संपत्तीचा आकडा आहे…

मोदींच्या हस्ते सुरु करण्यात आलेल्या या योजनेसंदर्भातील माहिती देणाऱ्या बातमीची लिंक गेट्स यांनी शेअर केली आहे. ” आयुष्मान भारत डिजिटल योजना राष्ट्रीय स्तरावर सुरु केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. या डिजिटल माध्यमातून मूलभूत सेवेमुळे आरोग्यसुविधा या समानतेने सर्वांना उपलपब्ध होतील. तसेच भारताला आरोग्य क्षेत्रातील ध्येय गाठण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल,” असा विश्वास गेट्स यांनी व्यक्त केलाय.

आरोग्यविषयक माहितीबाबत गुप्तता पाळली जाणार
दरम्यान या योजनेचा शुभारंभ करताना मोदी यांनी सांगितले की, आयुष्मान भारत डिजिटल योजनेत आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारक बदल घडवण्याची ताकद आहे. त्यांनी सांगितले की, १३० कोटी आधार कार्ड, ११८ कोटी मोबाइल वापरकर्ते, ४३ कोटी जन धन बँक खाती अशा पायाभूत सोयी जगात कुठेही सापडणार नाहीत. आयुष्मान भारत योजना विश्वासार्ह माहिती पुरवणार असून त्यातून रुग्णांवर योग्य उपचार शक्य होतील तसेच त्यांचा पैसाही वाचेल. आता या योजनेतील व्यक्तींना डिजिटल हेल्थ आयडी दिला जाणार आहे. प्रत्येक नागरिकाच्या आरोग्य नोंदी या डिजिटल पातळीवर साठवल्या जाणार आहेत. गरीब व मध्यमवर्गीय लोकांना यातून फायदा होऊ शकेल. आरोग्य सेतू अ‍ॅपमुळे करोना संसर्ग टाळण्यात मोठय़ा प्रमाणावर मदत झाली तसेच भारताने आता ९० कोटी लसमात्रा दिल्या असून कोविन उपयोजन व पोर्टल त्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे. जनधन योजना, आधार व मोबाइल या तीन सुविधांच्या माध्यमातूनच आता आयुष्मान डिजिटल कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. आरोग्यविषयक माहितीबाबत गुप्तता पाळली जाणार असून रुग्णांच्या परवानगीनेच त्यांची माहिती दिली जाईल.

आधी सहा ठिकाणी राबवली जायची योजना आता देशभरामध्ये झाली सुरुवात
आयुष्मान भारत योजनेत बदल होत गेले असून झालेलं डिजिटलायझेशने हा त्यातील एक नवा टप्पा आहे. आयुष्मान भारत डिजिटल योजनेचा पथर्शक प्रकल्प हा पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्लय़ावरून १५ ऑगस्ट २०२० रोजी जाहीर केला होता. सध्या आयमुष्मान भारत डिजिटल योजना पथदर्शक पातळीवर सहा केंद्रशासित प्रदेशात राबवली जात होती. आता ती देशभरात राबवण्यात येत असून त्याचवेळी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची तिसरी वर्षपूर्ती साजरी करीत आहे.

कोणत्या सुविधा असणार?
नागरिकांचे ‘आरोग्य खाते’ डिजिटल योजनेत आरोग्य आयडीच्या माध्यमातून आरोग्य खाते सुरू करण्यात येईल. त्यात आरोग्यविषयक माहिती जतन केली जाईल. आरोग्यसेवेतील डॉक्टरांची यादी, आरोग्य सुविधांची यादी अशा अनेक सुविधा त्यात असतील.