मानवातील जैविक घडय़ाळाचा उलगडा करणाऱ्या तीन वैज्ञानिकांना यंदाचा ‘शॉ’ पुरस्कार विज्ञान व वैद्यक शाखेत जाहीर करण्यात आला आहे. १० लाख डॉलर्सचा हा पुरस्कार असून तो प्रतिष्ठेचा मानला जातो.
अमेरिकी वैज्ञानिक जेफ्री हॉल, मायकेल रोसबाश व मायकेल यंग यांना हा पुरस्कार त्यांनी फळमाशीवरील संशोधनातून मानवी जैविक घडय़ाळाचा जो उलगडा केला त्या संशोधनासाठी देण्यात येत आहे, असे पुरस्कार देणाऱ्या संस्थेने म्हटले आहे. जैविक लय ही वनस्पती, प्राणी व माणूस यांच्या वर्तनावर प्रभाव टाकत असते. फुले दिवसा उमलतात व रात्री मिटतात, आपण दिवसा जागे असतो पण रात्री झोपतो, पण जेट लॅग असेल तर झोप विस्कळीत होते, अशी या जैविक लयीच्या परिणामांची अनेक उदाहरणे देता येतील. विज्ञान व वैद्यकशास्त्र शाखेत या तिघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
व्हर्जिनिया विद्यापीठातील जॉन हॉले व ऑक्सफर्ड विद्यापीठातील स्टीव्हन बाल्बस यांना खगोलशास्त्रात हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ताऱ्यांच्या निर्मितीत व महावस्तुमानाच्या कृष्णविवरांच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या अभिवृद्धी प्रक्रियेचा शोध त्यांनी लावला आहे.
गणित विज्ञानात हा पुरस्कार स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे डेव्हीड दोनोहो यांना नवीन गणिती व सांख्यिकी साधने विकसित केल्याबद्दल जाहीर करण्यात आला आहे. ‘शॉ’ पुरस्कार हा हाँगकाँगचे चित्रपट निर्माते रन रन शॉ यांच्या वतीने दिला जातो. येत्या २३ सप्टेंबरला पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार आहे.