जर्मनीची नागरिक असलेल्या महिलेवर राजस्थानात बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेला आणि पॅरोलवर सुटल्यानंतर सात वर्षे फरार असलेल्या बिट्टी मोहन्तीला शनिवारी केरळ पोलिसांनी अटक केली. बिट्टी मोहन्ती हा ओदिशाचे माजी पोलीस महासंचालक बी. बी. मोहन्ती यांचा मुलगा आहे.
बिट्टी मोहन्ती हा एका सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत अधिकारी म्हणून काम करीत होता आणि आपण मूळचे आंध्र प्रदेशातील असल्याचे त्याने सांगितले होते. राजस्थान, आंध्र प्रदेश आणि ओदिशा पोलिसांच्या आपण सातत्याने संपर्कात असल्याचे केरळ पोलिसांनी सांगितले. आपण अटक केलेली व्यक्ती म्हणजे बिट्टीच असल्याचा ठोस विश्वास पोलिसांना होता. राजस्थान पोलिसांना कन्नूर येथे येऊन बिट्टीची शहानिशा करण्यास सांगितले असल्याचे कन्नूरचे पोलीस अधीक्षक आर. आर. नायर यांनी सांगितले. जर्मनीची नागरिक असलेल्या एका महिलेवर बिट्टीने अलवारमध्ये बलात्कार केला होता आणि त्याला २००६ मध्ये सात वर्षांची शिक्षा ठोठाविण्यात आली होती. आपली आई आजारी असल्याने तिला भेटण्याची मुभा द्यावी, असे सांगून बिट्टी पॅरोलवर सुटला होता. त्यानंतर तो पसार झाला आणि त्याने एमबीएचे शिक्षण पूर्ण करून बँकेत नोकरी पत्करली. तथापि, दिल्लीतील सामूहिक बलात्कारानंतर अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांमधील आरोपींची छायाचित्रे दूरदर्शन, विविध वाहिन्या आणि इंटरनेटवरून प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर बिट्टीचा ठावठिकाणा निश्चित झाला.